चंद्रपूर -भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांनी "मला उमेदवारी मागण्यासाठी कुणाच्या पाया पडण्याची वेळ आली नाही" असे वक्तव्य गुरुवारी केले होते. यावर आता काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
"ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीच्या पाया मी नेहमीच पडतो. मात्र, उमेदवारीसाठी एखाद्याच्या पाया पडण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही. मला काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळावी, ही सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती. यातून निर्माण झालेल्या चळवळीतून मला उमेदवारी मिळाली, असे प्रत्युत्तर धानोरकर यांनी अहिर यांना दिले आहे. अहिर हे असल्या चळवळीतून कधीच उमेदवार झाले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
लोकसभा २०१९च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संपर्क, गाठीभेटी घेण्याची लगबग आता सुरू झाली आहे. यादरम्यान आज काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी 'ईटीव्ही'शी चर्चा केली. आपण 'जायंट किलर' मागच्या वेळी चारदा निवडून आलेले राज्यमंत्री संजय देवतळे यांचा पराभव केला आहे. यावेळी माझे प्रतिस्पर्धी तीनदा निवडणूक आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर कुठलेही ठोस काम केलेले नाही. सिंचन, उद्योग, रोजगाराच्या समस्येमुळे चंद्रपूर जिल्हा बकाल झाला आहे. अहिर हे वेकोलीत ६० हजार लोकांना आपण नोकरी लावून देण्याचा दावा करतात. मात्र, वेकोलीत प्रत्यक्ष काम करनारे मनुष्यबळ हे ४० हजार आहे. मग या नोकऱ्या लागल्या कुठे? उलट अहिर यांच्या कार्यकाळात ८ कोळसा खाणी बंद पडल्या.