चंद्रपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर, 1956ला नागपुरात आपल्या लाखों अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तर 16 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी चंद्रपूर गाठून येथेही आपल्या अनुयायांना दीक्षा दिली होती. याच दिवशी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने चंद्रपूरनगरी पावन झाली. हा धम्मक्रांतीचा प्रवास इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरला गेला.
नागपूरहून प्रस्थान
बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे ठरल्यानंतर बाबासाहेबांनी यासाठी नागपूर शहराची निवड केली होती. बाबासाहेबांचे मानसपूत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहाच्या विनंतीमुळे त्यांनी 16 ऑक्टोबरला चंद्रपूरला येण्याचे मान्य केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, प्रत्येक गावात समता सैनिक दलाच्या शाखा उघडण्यात आल्या. बाबासाहेब येणार याची सर्वांनाच कमालीची उत्सुकता होती. त्यानुसार तयारीही जोमात सुरू होती. इकडे 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी पाच लाख जनसमुदायाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. आता या धम्मक्रांतीचे साक्षीदार चंद्रपूर शहर होणार होते. यासाठी 16 ऑक्टोबर, 1956 ला बाबासाहेब नागपूरच्या श्याम हॉटेल येथून सकाळी पाच वाजता निघाले. त्यांच्या सोबत माईसाहेब, त्यांचे भाऊ कबीर, सेवक नानकचंद रत्तू होते. हे सर्व खासगी मोटारीने चंद्रपूरच्या दिशेने निघाले. उमरेड, भिवापूर, नागभीड, मूल आणि चंद्रपूर, असा हा प्रवास होता.
बाबासाहेबांनी चटणी-भागरीची केली होती मागणी
बाबासाहेबांचे मूल येथे स्वागत करण्यासाठी बॅरिस्टर खोब्रागडे यांचे वडील देवाजी भिवाजी खोब्रागडे आणि जनार्दन संत गुरुजी हे अगोदरच येथे पोहोचले होते. बाबासाहेबांची येथील शासकीय विश्रामगृहात व्यवस्था केली होती. बाबासोहब जेव्हा इथे आले तेव्हा प्रवासादरम्यान ते खूप थकलेले जाणवत होते. यादरम्यान त्यांनी काही खाल्ले नव्हते. त्यांनी खाण्यासाठी चटणी-भाकरीची मागणी केली. पिसाबाई गोवर्धन यांच्या घरून त्वरित चटणी भाकर आणून देण्यात आली. बाबासाहेबांनी ती आवडीने खाल्ली. यानंतर काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास बाबासाहेबांनी चंद्रपूरकडे प्रस्थान केले.
लाखोंचा जनसमुदाय उसळला
इकडे आजच्या दीक्षाभूमी परिसरात लाखोंचा जनसमुदाय आपल्या उद्धारकत्र्यांचा आतुरतेने वाट बघत होता. यवतमाळ, वणी, वर्धा तसेच पूर्वीच्या आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील बाबासाहेबांना मानणारा समाज लाखोंच्या संख्येने जमला होता. हातात दोन दिवसांची शिदोरी घेऊन आपल्या कुटुंबासह शेकडो मैलांचा प्रवास करत येथे नागरिक पोहोचले होते.
धम्मदीक्षा समारंभाची पूर्वतयारी
दीक्षाभूमी परिसरात सोहळ्यासाठी भव्य दोन मजली मंच सुसज्ज होता. व्यासपीठावर उंच टेबलावर भगवान बुद्धाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. देवाजी खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत समिती तयार करण्यात आली. बाबासाहेबांना सलामी देण्यासाठी समता सैनिक दल जिल्हा शाखेचे मुख्य कमांडर पुंडलिक बालाजी देव, उपकमांडर राजाराम रामटेके, शहरप्रमुख रामदास रायपुरे यांच्या नेतृत्त्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बाबासाहेबांनी दिली धम्मदीक्षा
बाबासाहेबांचे सर्किट हाउस येथे आगमन होताच त्यांना समता सैनिक दलातकडून मानवंदना देण्यात आली. थोडा वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी दीक्षाभूमीकडे प्रस्थान केले. त्यांचे सेवक नानकचंद रत्तू यांच्या मदतीने बाबासाहेब व्यासपीठावर आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमत होता. त्यांनी सर्वांना हात जोडण्यास सांगितले. त्यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील आणि धम्मदीक्षा दिली. नंतर बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा वाचण्यात आल्या. यानंतर बाबासाहेब खुर्चीवर बसले. त्यांनी जनसमुदायाला संबोधित करावे, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, बाबासाहेबांची प्रकृती बरी नव्हती. मणक्याच्या दुखण्यामुळे त्यांना कमालीच्या वेदना होत होत्या. मधुमेहाचा त्रासही वाढला होता. त्यांना विश्रांतीची गरज होती. बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. ते सर्किट हाउसमध्ये गेले.
बाबासाहेबांनी दिला संदेश
त्यानंतर 17 ऑक्टोबरला सर्किट हाउस येथे बाबासाहेबांना बघण्यासाठी गर्दी उसळली होती. त्याच दिवशी ते नागपूरहून दिल्लीला जाणार होते. बाबासाहेबांनी आपल्या मार्गदर्शन करावे, अशी सर्वांची उत्कट इच्छा होती. बाबासाहेबही हे जाणून होते. वऱ्हांड्यात खुर्चीवर बाबासाहेब बसले होते. त्यांनी उपस्थितांना संदेश दिला. ते म्हणाले, तुमच्यासाठी मी जे करू शकत होतो ते मी करून ठेवले आहे. आता पूर्वीचे जगणे सोडून द्या. आपल्या मुलामुलींना खूप शिकवा. नवरा जर दारू पित असेल तर त्याला घरात पाऊल ठेवू देऊ नका. आपल्या दरिद्रीपणाचे प्रदर्शन करू नका. नीटनेटके आणि स्वच्छ रहा, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. आता तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. याचे सक्तीने पालन करा. भगवान बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ मी तयार केला आहे. हा ग्रंथ कुठल्याही धर्मग्रंथाच्या तोडीचा आहे. त्यामुळे याचे नियमित वाचन करा. गाववस्तीत बौद्ध विहार तयार करून त्यात दर रविवारी एकत्र या, असे आवाहन बाबासाहेबांनी जनसमुदायाला केले.
जनसागर गहिवरला
आपल्या मानणाऱ्या समाजाचे प्रेम, ओढ बघता बाबासाहेबही भारावले होते. त्यांनी जनसमुदायाकडे पाहून 'आता मी तुम्हाला परत दिसणार नाही', असे म्हणाले. हे ऐकून सर्वांच्या भावनांचा बांध फुटला. महिला, पुरुष यांच्यासह सर्वजणांच्या डोळ्यात अश्रू दाटले. अस्पृश्य समाजासाठी आपले आयुष्य झिजवणाऱ्या या महामानवाला पाहूनच अनेकांचे हुंदके अनावर झाले. हे पाहून बाबासाहेबांच्या पापण्याही ओलावल्या.
अखेरचा निरोप
बाबासाहेब चंद्रपूरहून नागपूरला जाणार होते. बाबासहेबांची मोटार चंद्रपूर रेल्वेस्थानकाकडे निघाली. त्यांच्या सभोवताली समता सैनिक दलाचा चोख बंदोबस्त होता. गाडी रेल्वेस्थानकाजवळ पोहोचली. प्लॅटफॉर्मवर गाडीही आली होती. सेवक नानकचंद रत्तू यांनी बाबासाहेबांना आधार देत डब्यावर चढविले. दरवाजावर बाबासाहेब आणि संपूर्ण रेल्वेस्थानकाला व्यापणारा जनसमुदाय त्यांच्यासमोर होता. 'बाबासाहेब आंबेडकर की जय', 'भगवान गौतम बुद्ध की जय', अशा या जयघोषांनी सारा परिसर दुमदुमला होता. शेवट जड अंतकरणांनी सर्वांनीच बाबासाहेबांना निरोप दिला होता. बाबासाहेबांनी प्रत्यक्ष बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यामुळे चंद्रपूर शहराला इतिहासाच्या पानावर अढळ स्थान प्राप्त झाले आहे. आजही 15 व 16 ऑक्टोबरला बाबासाहेबांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दीक्षाभूमी येथे दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय उसळत असतो.
हे ही वाचा -VIDEO : ओशोंचे चंद्रपूरशीही होते नाते; पूर्वजन्मीच्या आईची लागली होती ओढ