चंद्रपूर - वयाची कोणतीही पर्वा न करता अविरत आरोग्यसेवा प्रदान करून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या एका डॉक्टरची ही कथा आहे. रामचंद्र दांडेकर असं या 87 वर्षीय डॉक्टरांचे नाव असून, आजही ते गावोगावी सायकलने फिरून रुग्णांची सेवा करीत आहेत.
वयाच्या 87व्या वर्षीसुद्धा सायकलने प्रवास करत रुग्णसेवा, 60 वर्षांपासून सुरू आहे कार्य देशात मार्च महिन्यापासून कोरोना संकटामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं. रुग्णांना तपासायला डॉक्टर घाबरायचे. रूग्णांना हात लावायलाही कुणी तयार नव्हते. अशाही परिस्थितीत रामचंद्र दांडेकर एखाद्या तरुणाप्रमाणे कार्यमग्न होते. होमिओपॅथीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेले दांडेकर मागील 60 वर्षांपासून रुग्णसेवा करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या गावी ते वास्तव्यास असून, तेथे त्यांचे एक रुग्णालय आहे. या रुग्णालयात रुग्णांना तपासल्यानंतर ते आपल्या सायकलने ग्रामीण भागात जातात. या वयातही ते सायकलनेच प्रवास करतात. जवळपासच्या खेड्यात जाऊन रुग्णांची भेट घेतात, उपचार करतात. गेल्या 60 वर्षांपासून हा त्यांचा नित्यक्रम आहे. कोरोना संकटाच्या काळात ज्येष्ठ डॉक्टरांना शासनाने सेवेतून सूट दिली असताना, दांडेकर मात्र निर्भयपणे रुग्णसेवा देत फिरत आहेत. या सेवेमुळे आत्मिक समाधान मिळते, असे त्यांचे मत आहे.
हेही वाचा -गांधींच्या कर्मभूमीचा इतिहास समृद्ध करणाऱ्या 'चरख्या'ची प्रतिकृती असणारा पूल
अनुभवसिद्ध असलेल्या डॉ. दांडेकर यांच्याकडे रुग्णांची रीघ लागलेली असते. रुग्णांना त्यांच्या उपचाराचा लाभ होत असल्याने त्यांच्यावरील विश्वास वाढत गेला. ही सेवा करीत असताना त्यांनी कधी पैशांसाठी रुग्णाला हटकले नाही. पैसे दिले तरी ठीक, नाही दिले तरी ठीक. ही त्यांची सेवा पुढच्या पिढीतही रुजली आहे. त्यांच्या स्नुषा किशोरी या सुद्धा डॉक्टर आहेत. शक्य तेवढी मदत त्या करीत असतात. सासऱ्यांच्या कामात त्यांचा मोठा हातभार लागतो.
डॉ. दांडेकर यांची मूल तालुक्यात मोठी ओळख आहे. त्यांचा संपर्कही तसाच आहे. त्यामुळे जुनेजाणते लोक आजही त्यांना फोन करून बोलावतात. त्याला डॉक्टरही तेवढाच प्रतिसाद देतात. त्यामुळे रुग्णांमध्ये त्यांच्या प्रती आदराची भावना आहे. डॉ. दांडेकर सांगतात, माझ्या हयातीत साथीचे अनेक गंभीर आजार बघितले. पण योग्य काळजी घेतली तर रोग दूर पळतो, हे सांगायला ते विसरत नाहीत. कोरोनाची भीती बाळगू नका, मात्र काळजी घ्या, असे प्रबोधनही ते करतात.
हेही वाचा -आदिवासी पाड्यांमध्ये 'शिक्षण रथ'च्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश; शिक्षक दाम्पत्य बनले रथाचे सारथी