चंद्रपूर -महाऔष्णिक वीज केंद्रात नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी वीज केंद्राच्या चिमणीवर चढून प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महिलांचाही समावेश आहे. यातील एकाने तर चिमणीवरुन उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याला इतर जणांनी पकडल्याने पुढील अनर्थ टळला. या आंदोलनाला तीस तासांपेक्षा अधिकचा वेळ झाला आहे. मात्र, वीज केंद्राचे प्रशासन कुठलाही तोडगा काढण्यासाठी उत्सुक नाही. उलट या प्रकल्पग्रस्तांची क्रूर थट्टा करण्यात येत आहे.
मुख्य अभियंता राजू घुगे यांना चिमणीवर चढलेले प्रकल्पग्रस्त वारंवार फोन करीत आहेत. मात्र, ते त्यांना राँग नंबर सांगत बोलणे टाळत आहेत. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याऐवजी त्यांना पांगवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे.
हे प्रकल्पग्रस्त मोबाईलमधून व्हिडिओ काढून आपल्या मागण्या सांगत आहेत. या चिमणीमध्ये मोबाईल चार्ज करण्याची सुविधा होती. मात्र, ती थांबविण्यासाठी या संपूर्ण चिमणीचाच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कुठल्याही इतर प्रकल्पग्रस्तांना वीज केंद्राच्या आवारातही येऊ दिले जात नाही आहे. चिमणीवरील आंदोलनकर्ते मागील 24 तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी आहेत. त्यांनी पाणीही पिलेले नाही. यामुळे ते अशक्त झाले आहेत. त्यांना चक्कर येत आहे. त्यांना साधे पाणी पाठविण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. अशावेळी कोणी खाली कोसळले तर याची जबाबदारी कोण घेणार? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.