चंद्रपूर -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) राजूरा शहरातील आठवडे बाजार पूर्णतः बंद करण्यात आला आहे. दरम्यान, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रपूरमध्ये प्रशासनाचा आदेश न पाळणाऱ्या चार दुकानदारांवर कारवाई हेही वाचा -सॅनिटायझरची खरेदी करण्याकरता 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार १ हजार रुपये
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल, नगर, पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत दोन दिवसापूर्वीच राजूरा नगर प्रशासनाने सर्वांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सकाळपासून आठवडी बाजारात संपूर्ण शुकशुकाट दिसून येत होता. लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. राजूरा पोलीस प्रशासनही जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत नागरिकांना आवाहन करीत आहे.
जिल्हा प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्या चार दुकानदारांवर पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केलेले आहे.