चंद्रपूर - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. पहिल्या दोन लाटेचा अनुभव लक्षात घेता भविष्यात कोविडच्या उपाययोजनेसंदर्भात आणखी सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ॲक्शन प्लॉन’ तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहेत.
कोरोनासंदर्भात विविध सुचना -
सार्वत्रिक निवडणूक किंवा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्याकरीता ज्याप्रकारे 'ॲक्शन प्लॅन' तयार केला जातो, त्याच धर्तीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याने इत्यंभूत माहिती आतापासून तयार करावी. यात आपापल्या तालुक्यातील खासगी रुग्णालयांची संख्या, तज्ज्ञ डॉक्टरांची यादी, विलगीकरणासाठी लागणाऱ्या शासकीय इमारती, खासगी सभागृहे, मंगल कार्यालये, आतापर्यंत मोठमोठ्या खासगी उद्योगांनी कोविडमध्ये केलेली मदत, कोविड केअर सेंटर, डेडीकेडेट कोविड हेल्थ उभारण्यासाठी जागांचा शोध आदींचा समावेश असावा, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केला.
'विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करा' -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे टेस्टिंग होणे गरजेचे आहे. यात आयएलआय व सारीच्या रुग्णांची टेस्टिंग, पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो-रिस्क काँटॅक्ट, सुपर स्प्रेडर, नरेगाच्या बांधकामावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मजूर, गोसेखुर्दच्या बांधकाम साईड्स, विविध तालुक्यात असलेल्या मोठमोठ्या कंपन्यातील मजूरवर्ग यांचा समावेश असावा. तसेच नियमांचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्यांची टेस्टिंग व्हायलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
लसीकरणाच्या फेक मॅसेजला बळी पडू नका -
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये लसीकरण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कोरोनावरील लस ही अतिशय सुरक्षित आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यामुळे इतरही पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत:हून समोर यावे. तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी तीन महिन्यांनी लस घ्यावी. बाळांना दूध पाजणाऱ्या मातांसाठीसुद्धा लस अतिशय सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्ती रक्तदान करू शकतात, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच लसीकरणाच्या फेक मॅसेजला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा - गेल्या चाळीस वर्षातील सर्वात अंधकारमय वर्ष...घसरलेल्या जीडीपीवरून पी. चिदंबरम यांची सरकावर टीका