चंद्रपूर - भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांच्या नावावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक विक्रम आहेत. आजपर्यंत सर्वाधिक मतदान घेऊन निवडून येण्याचा मान हंसराज अहिर यांच्या नावावर आहे. 2014 मध्ये ते तब्बल 5 लाख 8 हजार 49 मते घेऊन निवडून आले होते.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीचा इतिहास मोठा रंजक आहे. या लोकसभा क्षेत्रात एकूण ६ विधानसभा क्षेत्र येतात. 1951 पासून 2004 पर्यंत या लोकसभा क्षेत्रात गडचिरोली, सिरोंचा, राजुरा, चंद्रपूर, सावली, भद्रावती हे विधानसभा क्षेत्रांचा समावेश होते. 2009 पासून सावली, सिरोंचा, गडचिरोली विधानसभा क्षेत्र वगळण्यात आले आहेत. त्यानंतर राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी हे विधानसभा क्षेत्र तयार झाले आहे.
चंद्रपूर लोकसभेच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक टक्केवारी घेऊन निवडून येण्याचा मान काँग्रेसचे खासदार मुल्ला अब्दुलभाई ताहेर अली यांच्या नावावर आहे. देशातील पहिली निवडणूक 1951 साली झाली. यावेळी ताहेर अली हे एकून मतदानाच्या तब्बल 61.77 टक्के मते घेऊन निवडून आले होते. एकूण 2 लाख 30 हजार 336 मतांपैकी 1 लाख 42 हजार 277 ताहेर अली यांना मिळाली होती. आजवर सर्वाधिक मतदान घेऊन निवडून येण्याचा मान भाजपचे हंसराज अहिर यांच्या नावावर आहे. 2014 मध्ये ते तब्बल 5 लाख 8 हजार 49 मते घेऊन निवडून आलेत. सर्वाधिक कमी मते घेऊन निवडूनयेण्याची नामुष्की शेख अब्दुल राउफ सुलेमान 'पपामिया यांच्यावर ओढविली. 1996 मध्ये ते अपक्ष म्हणून लढले असता त्यांना केवळ 112 मते मिळाली होती.
सर्वात कमी मतांच्या फरकानेही हंसराज अहिर निवडून आले होते. 1999 मध्ये ते अवघ्या ३ हजार हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी अहिर यांनी नरेश पुगलियांचा पराभव केला होता. 2014 ला काँगेसचे उमेदवार संजय देवतळे यांना अहिरांनी 2 लाख 29 हजार मतांनी पराभूत केले. अहिर यांना 5 लाख 8 हजार 49 मते मिळाली होती तर देवतळे यांना 2 लाख 71 हजार 780 मते मिळाली. सर्वाधिक वेळा उमेदवारी मिळण्याचा विक्रमही अहिर यांच्याच नावावर आहे. त्यांना सलग 5 वेळा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यापूर्वी हा विक्रम माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या नावावर होता. सर्वाधिक वेळा निवडून येण्यात हंसराज अहिर आणि शांताराम पोटदुखे यांचे नाव पुढे आहे.
शांताराम पोटदुखे हे 1980, 1984, 1989 आणि 19891 ला कॉंग्रेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर अहिर हे 1996, 2004, 2009 आणि 2014 ला निवडून आले होते. 2019 ला निवडून अहिर निवडून आल्यास शांताराम पोटदुखे यांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त उमेदवार हे 1996 च्या निवडणुकीत लढले. त्यावेळी तब्बल 24 उमेदवार रिंगणात होते.