चंद्रपूर- वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे तिकीट मिळविण्यासाठी १४ इच्छुकांनी मुलाखत दिली. यामध्ये डॉ. आसावरी देवतळे आणि काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा समावेश आहे. या दोन्ही उमेदवारांना अन्य इच्छुक उमेदवारांनी विरोध दर्शवला आहे. याबाबतचे पत्र पक्षश्रेष्ठींना देण्यात आले आहे.
३१ जुलै रोजी जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या मुलाखती झाल्या. निवड समितीमध्ये आमदार वीरेंद्र जगताप, किशोर गजभिये, शकूर नागाणी यांचा समावेश आहे. जिल्हा निवड समितीत नंदू नगरकर, सुभाष धोटे, प्रकाश देवतळे, सतीश वारजूरकर, महेश मेंढे, घनश्याम मुलचंदानी, हरीश कोतावार, आसावरी देवतळे, पवन आगदारी, मलिक शाकिर यांचा समावेश आहे. या समितीसमोर वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी १४ जणांनी मुलाखती दिल्या. यामध्ये प्रकाश मुठाळ, विठ्ठल टाले, प्रकाश शिंदे, भावना वानखेडे, छोटुभाई शेख, डॉ. खापणे, डॉ. आसावरी देवतळे, विजय देवतळे, देवराव घाटे, प्रतिभा धानोरकर, मोहन डोंगरे, दिनेश चोखारे, सुनंदा जीवतोडे आणि अन्य एकाचा समावेश आहे. या मुलाखतीदरम्यान अन्य इच्छुक उमेदवारांनी डॉ. आसावरी देवतळे आणि प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.