मुंबई- दिंडोशी परिसरात सोने व्यापाऱ्याची हत्या झाली होती. पोलिसांनी व्हॉटसअॅप व्हिडिओ कॉलच्या सहाय्याने केवळ २४ तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे. सोबतच चोरीला गेलेले ६ लाखांचे सोने आणि ५ लाख रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.
सोने व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केल्याची माहिती देताना दिंडोशी पोलीस
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खोत कुआ रोड या परिसरात सोने व्यापारी नितेश सोनी यांचा सोन्याचे दागिने घडविण्याचा कारखाना होता. ११ मे रोजी त्यांच्याच कारखान्यात नितेश सोनी यांचा मृतदेह रक्ताने माखलेला स्थितीत पोलिसांना आढळून आला होता. या संदर्भात दिंडोशी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.
काही वर्षांपूर्वी हेमंत सागरमल सोनी याच्यासोबत मयत नितेश सोनी याची मैत्री झाली होती. मैत्री झाल्यामुळे मयत नितेश सोनी याने आरोपी हेमंत सागरमल सोनी यास दागिने बनविण्याचे काम शिकवले होते. हेमंत यास स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात नितेश सोनी यांनी मदत केली होती. मात्र, हेमंत सोनी यास दारू व डान्स बारचा नाद होता. यामुळे दोघांमध्ये धंद्यावरून सतत खटके उडत होते.
आरोपी हेमंत याला जडलेल्या व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. याला जबाबदार नितेश सोनी असून त्यानेच आपल्या पत्नीचे डोके भडकवल्याचा संशय हेमंत यास होता. ११ मे रोजी आरोपी हेमंत हा नितेश सोनी यांच्या कारखान्यावर बारमध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीसोबत आला होता. रात्रभर तो नितेश सोनी सोबत राहिला होता. पहाटेच्या वेळी मृत नितेश आणि हेमंत यांच्या भांडण झाल्याने आरोपी हेमंत याने नीतेश च्या डाव्या डोळ्यांत चाकू खुपसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन नितेश सोनी याचा मृत्यू झाला होता. यानंतर आरोपी हेमंत आणि त्याच्या प्रेयसीने कारखान्यातील ५ लाख रोकड आणि ६ लाखांचे ३५० ग्राम चोरुन राजस्थानला पळ काढला होता.
व्हॉटसअॅप व्हिडिओ कॉल कनेक्शन
मयत नितेश सोनी याने त्याच्या कारखान्यावर आरोपी हेमंत व त्याची प्रेयसी आल्यावर आपल्या पत्नीला व्हॉटसअॅप व्हिडिओ कॉल केला होता. यामध्ये हेमंत आणि त्याची प्रेयसी कारखान्यावर आल्याचे सांगितले होते. हीच गोष्ट मयताच्या पत्नीने पोलिसांना सांगितल्यावर तांत्रिक माहितीच्या आधारावर राजस्थानमधून पोलिसांनी आरोपींना अटक केली.