मुंबई- भारतातील बहुजन समाज आजपर्यंत वंचित होता. बाळासाहेबांनी (प्रकाश आंबेडकरांनी) वंचित समाज एकत्र आणला आहे. बाळासाहेबांनी समाजाला एकत्र करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. वंचित समाजातील विविध घटकांना उमेदवारी दिली. यामुळे खरी लढाई वंचितांबरोबरच असल्याचे सर्वपक्षीय उमेदवारांना कळून चुकले आहे, त्यामुळे दिग्गजांना घाम फुटला आहे, अशी प्रतिक्रिया ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व मुंबई) या मतदारसंघाच्या उमेदवार निहारिका खोंदले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
निवडणुकांमध्ये मतदाराला आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखवली जातात. ज्या उमेदवारांना आपल्या स्वतःवर निवडून येण्याचा विश्वास नसतो, अशा उमेदवारांना प्रलोभने दाखवावी लागतात. वंचित आघाडीचा उमेदवार हा एका विचारांचा आहे, तो प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. तो विचार त्या उमेदवाराला संसदेमध्ये घेऊन जायचा आहे. उमेदवाराइतकीच जबाबदारी मतदारांचीही आहे. यामुळे काही झाले तरी मतदार कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.