मुंबई - शहरातील कुर्ला परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुंबई महानगरपालिकेकडून नौदलाची मदत घेतली जात आहे.
मुंबईत नौदलाकडून बचावकार्य सुरू; हजारपेक्षा जास्त लोकांना हलवले सुरक्षितस्थळी - मुंबई
नौदलाच्या जवानांकडून कुर्ला परिसरात पाण्यात अडकलेल्या जवळपास १ हजारहुन अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
आयएनएस तानाजी आणि मटेरिअल ऑर्गानायझेशनवरील नौदलाच्या तुकड्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. नौदलाच्या जवानांकडून कुर्ला परिसरात पाण्यात अडकलेल्या जवळपास १ हजारहुन अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. बचावकार्यासाठी वाहने पोहोचत नसल्याचे पाहुन नौदल तुकड्यांनी पायी जात नागरिकांना मदत केली. नौदल तुकड्यांनी लहान मुले आणि वृद्धांना आवश्यक असलेली सर्व सुरक्षेची साधने पुरवली आहेत.
पावसाचा जोर पाहता नौदलाचे जवान कुर्ला परिसरात मदतकार्यात जुंपले आहेत. रस्त्यावर जमा झालेले पाणी काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून साठलेल्या पाण्यात अडकलेल्या वाहनांना हटविण्यात येत आहे. नौदल तुकडीसोबतच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि अग्निशामक दलाच्या तुकड्यांसह काही स्थानिक स्वयंसेवकही गरजूंच्या मदतीसाठी काम करत आहेत.