मुंबई :-पावसाने मुंबईत सोमवारी सकाळपासूनच दमदार हजेरी लावल्याने मध्य रेल्वेवरील विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार स्टेशनदरम्यान रुळावर पाणी साचले. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8.30 ते 11.30 या वेळात कुलाबा येथे 12.2 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 108.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पालिकेच्या पाऊस नोंद करणाऱ्या केंद्रांवर सकाळी 8 ते 12 या चार तासात शहरात धारावी अग्निशमन केंद्र येथे 67 मिलिमीटर, दादर येथे 65 मिलिमीटर, माटुंगा येथे 64.5 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात मरोळ अग्निशमन केंद्र येथे 121 मिलिमीटर, अंधेरी पूर्व येथे 103 मिलिमीटर, विलेपार्ले अग्निशमन केंद्र येथे 100 मिलिमीटर तर पूर्व उपनगरात कुर्ला अग्निशमन केंद्र येथे 120 मिलिमीटर, विक्रोळी अग्निशमन केंद्र येथे 114 मिलिमीटर, चेंबूर येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आजही साकळपासून पाऊस पडल्याने काही सखल भागात पाणी साचले. यात घाटकोपर, विक्रोळी, सायन, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी आदी विभागांचा समावेश आहे. पाणी साचल्याने माटुंगा गांधी मार्केट येथील बसची वाहतूक भाऊ दाजी रोडवर वळवण्यात आली. तर सायन रोड नंबर 24 येथील वाहतूक रोड नंबर 3 येथून वळवण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या लालबाग पुलावर एका ट्रकचा अपघात झाला होता. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. हा ट्रक पुलावरून खाली पडला असता तर आणखी मोठा अपघात घडला असता. मात्र पोलिसांनी वेळीच हा ट्रक बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. ठाणे आणि दिवा दरम्यान पाऊस जोरात असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर मार्गावर वडाळा रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. बिघाड दुरुस्त झाल्यावर या ठिकाणची वाहतूक सुरु करण्यात आली होती. तरीही वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे.
वळवलेले 'बेस्ट'चे मार्ग -
किंग सर्कल, गांधी मार्केट, सायन, संताक्रूझ मिलन सबवे, सायन वल्लभ रोड, प्रतीक्षा नगर, बांद्रा एस व्ही रोड नॅशनल कॉलेज, गोरेगाव मोतीलाल नगर या भागात पाणी भरल्याने बेस्टच्या 36 मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहेत.
एमटीएनएल सेवा ठप्प -
सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या एमटीएनएलची सेवा ठप्प झाली आहे. यामुळे इंटरनेट आणि फोन येणे जाणे बंद झाले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे फोन आणि इंटरनेट वापरले जात असल्याने महापालिका मुख्यालयासह सीएसएमटी परिसरातील कार्यालयांमधील इंटरनेट आणि फोन सेवा बंद आहे. दरम्यान मेट्रोच्या कामामुळे एमटीएनएलच्या केबल्स तुटल्याने ही सेवा बंद आहे. याबाबत एमटीएनएल मेट्रोला नोटीस देणार असल्याचे समजते.