महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसामुळे लोकल उशिरा तर 'बेस्ट'चे मार्ग वळवले, मुंबईकरांचे हाल - wadala

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. तर पाणी साचल्याने बसचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या दक्षतेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठा अपघात टळला आहे.

लालबाग पुल

By

Published : Jul 8, 2019, 12:46 PM IST

Updated : Jul 11, 2019, 10:56 AM IST

मुंबई- जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकलही १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर काही सखल भागात पाणी साचल्याने बेस्टच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. परिणामी आज सकाळीच कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

दहा दिवसांपूर्वी मान्सूनने मुंबईत जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली. पावसाने मुंबईत आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून हजेरी लावल्याने मध्य रेल्वेवरील विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार स्टेशनदरम्यान रुळावर पाणी साचले. ठाणे आणि दिवा दरम्यान पाऊस जोरात असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. हार्बर मार्गावर वडाळा रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. बिघाड दुरुस्त झाल्यावर या ठिकाणची वाहतूक सुरू करण्यात आली असली तरीही वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.

पावसामुळे लोकल उशिरा तर 'बेस्ट'चे मार्ग वळवले, मुंबईकरांचे हाल

पाणी साचल्याने बस मार्ग वळवले-

मुंबईत जरासा पाऊस पडला तरी नेहमीच सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. आजही सकाळपासून पाऊस पडल्याने काही सखल भागात पाणी साचले. यात घाटकोपर, विक्रोळी, सायन, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी आदी विभागांचा समावेश आहे. पाणी साचल्याने माटुंगा गांधी मार्केट येथील बसची वाहतूक भाऊ दाजी रोडवरून तर सायन रोड नंबर २४ येथील वाहतूक रोड नंबर ३ येथून वळवण्यात आली.

पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा अपघात टळला-


मुंबईकडे जाणाऱ्या लालबाग पुलावर एका ट्रकचा अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. हा ट्रक पुलावरून खाली पडला असता, तर आणखी मोठा अपघात घडला असता. मात्र पोलिसांनी वेळीच हा ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली.

Last Updated : Jul 11, 2019, 10:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details