बुलडाणा- जिल्ह्यातील खांमगाव मतदारसंघातील व शेगाव तालुक्यातील खेर्डा हे गाव भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी दत्तक घेतले होते. हे गाव गेल्या ४ वर्षापासून भीषण पाणी टंचाईच्या छायेत आहे. येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत आहेत. प्रशासनाने पाण्याचे टँकर सुरू केले, मात्र या टँकरमधून पिण्यायोग्य पाणी दिले जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी आलेल्या काँग्रेस पक्षाच्या समितीपुढेही ग्रामस्थांनी गाऱ्हाणे मांडत भाजप आमदार फुंडकर यांचा निषेध केला.
यावर समिती अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनाला धारेवर धरत, आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावाची जर अशी परिस्थिती असेल, तर राज्याची काय असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येथील महिलांचा शाप लागणार असून या शासनाला त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागणार असल्याची टीका विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली. प्रशासन गावातील लोकांना पिण्यायोग्य पाणी देत नसेल तर आपण स्वखर्चाने या गावकऱ्यांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करणार असल्याची घोषणा या भागाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केली.