बुलडाणा- गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यानंतर खामगाव, शेगाव, मलकापूर शहरांमध्ये भाजीपाला महागला आहे. दोडका, श्रावण घेवडा या भाज्यांची आवक बंद झाली आहे. पावसाचा फटका सर्वांनाच बसल्याने भाजीपाला उत्पादनाखालील क्षेत्राची पूर्ण काढणी केल्यामुळे भाजीपाल्याची आवक गेल्या चार दिवसांपासून निम्म्याने घटली आहे. त्यामुळे दरात चांगलीच वाढ झाली आहे. यात सर्वात जास्त वाढ पालेभाज्या व ठराविक फळभाज्यांमध्ये झाली आहे.
हेही वाचा -सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आमची नजर; भाजप बैठकीनंतर शेलारांचे वक्तव्य
किरकोळ बाजारातही भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक घटल्यामुळे फळभाज्यांसह भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे नेहमी कवडीमोल दराने विकला जाणारा फ्लॉवर व कोबीच्या दरातही वाढ झाली आहे. तर, दोडका, श्रावण घेवडा भाजीची आवकच ठप्प झाली आहे. दहा ते पंधरा रुपये किलो असणाऱ्या काकडीचा दर ५० रुपयांवर पोहोचला आहे. पाहूया एक विशेष वृत्तांत.....
विदर्भासह संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. सोयाबीन पूर्णता हातून गेलेला असून या पावसाचा फटका भाजीपाला उत्पादकांनाही बसला आहे. पावसामुळे उत्पादन घटल्याने आवक घटल्याचा हा परिणाम म्हणून भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही पावसाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामध्ये घाटाखालील भागात सर्वाधिक नुकसान असल्याने किरकोळ बाजारात मेथी ८० रु.किलो, गोबी ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो, वांगे ८० किलो, पालक-आंबडचुका- शेपू ६०रु.किलो, कोथिंबीर २०० किलो, कांदा ८० रु.किलो, काशिफळ ६० रु.किलो, भेंडी १५ ते २० रुपये किलोवरून २० ते २४ रुपये किलो, फ्लॉवर ८ ते १० रुपये किलोवरून १५ ते १८ रुपये किलो झाला आहे. गवार २५ ते ३० रुपये किलोवरून ३० ते ४० रुपये किलो, घेवडा १८ ते २० रुपये किलोवरून ३६ ते ४० रुपये किलो, १८ ते २० रुपये किलो असणारी दोडकी ३२ ते ३४ रुपये किलो झाली आहेत. घाऊक बाजारातच भाज्यांचे दर वाढले असल्याने किरकोळ बाजारात भाज्या खरेदी करताना ग्राहकांना आपला खिसा रिकामा करावा लागत आहे.