बुलडाणा- चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये अपहार केल्या प्रकरणी बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १८ नोव्हेंबर रोजी आरोपींना चिखलीतील त्यांच्या राहत्या घरी सापळा रचून अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था, चिखलीचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात, व्यवस्थापक सतीश प्रल्हाद वाघ, रोखपाल परमेश्वर सुखदेव पवार, राऊतवाडी शाखा व्यवस्थापक गणेश कचरूजी खंडागळे यांच्याविरूद्ध पतसंस्थेत अपहार केल्याप्रकरणी १२ जुलै २०१९ रोजी चिखली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. खोटे व बनावट रोख कर्ज प्रकरणे तयार करून ठेवीदारांच्या पैशातून १ कोटी ४७ लाख २० हजार ३२९ रुपये उचल करून अपहार केल्याचा आरोप उपरोक्त व्यक्तींवर आहे. या प्रकरणाचा तपास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात सदर आरोपींनी ४ कोटी २४ लाख ५८ हजार ८८ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.