बुलडाणा- महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत घडवून आणलेल्या भ्याड हल्ल्यात सी-६० कमांडो पथकातील १५ जवान हुतात्मा झाले. जवानांचे वाहन जात असलेल्या मार्गावर नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटके पेरुन ठेवले होती. त्यावरुन जवानांचे वाहन जाताच आयईडीचा स्फोट झाला. या घटनेत बहुतांश जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. या घटनेत वीरमरण आलेल्या जवानांपैकी बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश असून सर्जेराव उर्फ संदीप खर्डे (रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) व मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (वय ३३) अशी दोन्ही जवानांची नावे आहेत.
नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोघांचा समावेश - martyrs are from buldhana
पुलवामा हल्ल्यातही बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आले होते. आता आणखी दोन जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. जवान राजू गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, ३ वर्षांची मुलगी, ८ महिन्यांचा मुलगा आहे. तर संदीप खर्डे यांच्या पत्नी, २ वर्षांची मुलगी, आईवडील, भाऊ असा परिवार आहे.
शहीद जवान सर्जेराव खर्डे हे २०११ मध्ये गडचिरोलीत राज्य राखीव दलात भरती झाले होते. यांचे वडील एकनाथ खर्डे हे आळंद (ता. देऊळगाव राजा) येथील सरपंच आहेत. त्यांचा भाऊ दीपक खर्डे याचे सोलापूरला प्रशिक्षण झाले आहे. सर्जेराव यांच्या पश्चात पत्नी स्वाती खर्डे, मुलगी (वय २ वर्ष), आणि आई कमलाबाई असा परिवार आहे. तर दुसरे जवान राजू गायकवाड (वय २४) हे गडचिरोली येथे ७ वर्षांपूर्वी भरती झाले होते. त्यांचे ५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ वर्षांची मुलगी, ८ महिन्यांचा मुलगा आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्हाभर शोककळा पसरली आहे.