बुलडाणा -जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील उमरा फाटा येथे रेशन धान्याचा ट्रक व दुचाकीत भीषण अपघात झाल्याची घटना घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीचालक राजू शामराव मिरटकर (वय 30) गंभीर जखमी झाले असून पत्नी विमलबाई मिरटकर (वय 28) व मुलगा रोशन मिरटकर (वय 6) हे दोघेही जागीच ठार झाले आहे. ते मोताळ्याहुन मजुरी करण्यासाठी अकोल्याच्या मंगरूळपीर येथे दुचाकीने जात होते.
बुलडाणा : उमरा फाट्याजवळ ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार
बुलडाण्याच्या उमरा फाट्याजवळ बुधवारी सकाळी रेशन धान्याचा ट्रक व दुचाकीत भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू शामराव मिरटकर हे बुलडाण्याच्या मोताळा येथील रहिवासी असून ते अकोल्याच्या मंगरुळपीर येथे मजुरीची कामे करीत होते. बुधवारी सकाळी ते मोताळ्याहून आपल्या दुचाकीने (एम.एच.29 झेड 5541) मजुरी कामासाठी पत्नी विमलबाई मिरटकर व मुलगा रोशन मिरटकर यांना घेवून जात होते. दरम्यान, पिंपळगाव राजा पोलीस ठाणे हद्दीतील उमरा फाट्याजवळ रेशन धान्याचा ट्रक (एम.एच.31 सिबी 6755) व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालक राजू मिरटकर गंभीर जखमी झाले. तर, पत्नी विमलबाई व मुलगा रोशन मिरटकर हे दोघेही जागीच ठार झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील किशोर अंभोरे यांनी घटनास्थळावर जाऊन जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेने सामान्य रुग्णालय खामगाव येथे पाठवले. तसेच, पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन चव्हाण यांना फोनद्वारे माहिती दिली. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात रेशन धान्याच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.