बुलडाणा - विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा 'श्री'चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीसाठी निघणार आहे. भजनी दिंडी, गज व अश्वासह शनिवारी ८ जूनला सकाळी ७ वाजता या पालखीचे प्रस्थान होणार आहे. श्रींच्या पालखीचे हे ५२ वे वर्ष असून या पालखीसोबत ५०० वारकरी एकूण १२७५ किलोमीटरचा प्रवास २ महिन्यात पूर्ण करणार आहेत.
संपूर्ण राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. शेगाव येथील श्री गजानन संस्थानचेही १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी खंड न पडता सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे ५२ वे वर्ष आहे. शेगाव संस्थानने पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिराकडून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण आहे.
श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ किमी आणि पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर असा एकूण १२७५ किलोमीटरचा हा प्रवास आहे. श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात येतो. तद्नंतर श्रींची पालखी शनिवारी ८ जूनला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान करणार आहे.
पालखीसोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था तसेच दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. तर रात्रीच्या मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. दिंडीतील वारकरी मंडळींना आवश्यकतेनुसार औषधे, इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याकरीता टँकरची व्यवस्था केलेली असते.