महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 2, 2021, 10:27 PM IST

ETV Bharat / state

बुलडाण्यात समृध्दी महामार्गाचे काम सुरू; शेतकऱ्यांचा विरोध कायम

जिल्ह्यातून ८७ किलीमोटरचा समृद्धी महामार्ग जात आहे. हा मार्ग शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण, त्या मार्गाच्या दोन्ही बाजूकडे संरक्षण भिंत बांधली जात आहे.

समृध्दी महामार्गाचे काम सुरू
समृध्दी महामार्गाचे काम सुरू

बुलडाणा- विकासासह प्रगतीच्या संधी निर्माण करणाऱ्या नागपूर-मुंबई म्हणजेच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मेहकर-लोणार पॅकेज ६ चे काम ६५ टक्के तर देऊळगावराजा-सिंदखेडराजा पॅकेज ७ चे काम ४० टक्क्यापर्यंत पूर्ण होत आले आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या 87 किमीच्या समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आला. राज्याची उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई असे अंतर काही तासांवर आणून विकास वेग वाढविण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातही मेहकर, लोणार, देऊळगावराजा व सिंदखेडराजा अशा चार तालुक्यातील ४९ गावांच्या मधून ८७ किमीचा हा महामार्ग जात आहे. भुसंपादनातही हा जिल्हा अव्वल होता. १०० टक्के जमीन समृध्दी महामार्गाच्या संदर्भात ही जमीन (११३६ हेक्टर) संपादित झाली आहे. पॅकेज ६ व पॅकेज ७ अशा दोन टप्प्यात जिल्ह्यात महामार्गाचे काम सुरू आहे.

हेही वाचा-2020 मागोवा# राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांची काय आहे स्थिती, जाणून घ्या एका क्लिकवर

-पॅकेज ६ मध्ये ३६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ कोटींची तरतूद-

पॅकेज ६ मध्ये मेहकर, लोणार तालुक्यातील ३६ किमीचे काम अ‍ॅपको इन्फ्रा करत आहे. या महामार्गासाठी एकूण १३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. आतापर्यंत ६५ टक्के काम पुर्णत्वास आले आहे. पॅकेज ६ च्या ३६ किमीच्या कामाची सुरुवात डिसेंबर -२०१९ मध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्री आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर

-पॅकेज ७ मध्ये ५१ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १६ कोटींची आहे तरतूद-

पॅकेज ७ मधील देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यातील ५१ किमीचे महामार्गाचे काम रिलायन्स सब कॉन्ट्रॅक्ट ही कंपनी करत आहे. या महामार्गासाठी १६ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. हे काम ४० टक्के पुर्णत्वास आले आहे. पॅकेज ७ च्या ५१ किमीच्या कामाची सुरुवात एप्रिल- २०२० मध्ये करण्यात आली आहे.

-समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी-

जिल्ह्यातून ८७ किलीमोटरचा समृद्धी महामार्ग जात आहे. हा मार्ग शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण, त्या मार्गाच्या दोन्ही बाजूकडे संरक्षण भिंत बांधली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संरक्षण भिंत बांधकामाला डोणगाव, बेलगाव, अधृड, उमरा देशमुख यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून विरोध केला आहे.

मे २०२० पर्यंत संपूर्ण काम होणार पूर्ण

येत्या आठ महिन्यात म्हणजेच १ मे रोजी २०२१ ला या मार्गातील ५२० किमीचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा महामार्ग सेवेत दाखल करण्यात येणार आहे. तर ६२३ किमीचा नागपूर ते इगतपुरी हा टप्पा डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details