महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्टिंग ऑपरेशन : बुलडाण्यात परीक्षेला सुरुवात होऊन अर्धा तास होताच प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर

बबनराव देशपांडे विद्यालयातून १२ वीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका परिक्षा सुरू होताच व्हॉट्सअॅपवरून बाहेर आल्याची चर्चा होती. त्याप्रकरणी चौकशीमध्ये काहीच हाती न लागल्याचा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी दावा केला. देशपांडे विद्यालय भाजप सत्ताधाऱ्याचे असल्याने शिक्षणाधिकारी या शाळेवर कारवाई करण्यापासून घाबरत असल्याचे बोलले जात आहे.

By

Published : Mar 9, 2019, 9:45 AM IST

हिंदी विषयाची फुटलेली प्रश्नपत्रिका

बुलडाणा- जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानात सुरू असलेल्या बारावी व दहावीच्या परीक्षेत परीक्षा सुरू होताच चक्क अर्धा तासातच प्रश्न पत्रिकेतील प्रश्न परीक्षा केंद्रातूनच बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील मोताळा येथील बबनराव देशपांडे विद्यालयातून गुरुवारी ७ मार्चच्या सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी हिंदी विषयाच्या परिक्षेच्या दिवशी हा प्रकार घडला. यानंतरही जिल्ह्याचे परीक्षा नियंत्रक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. अशा प्रकरणात गुन्हा दाखल होवू शकतो का हे पाहतो? असे उत्तर त्यांनी दिले.

स्टिंग ऑपरेशन

विशेष म्हणजे याच बबनराव देशपांडे विद्यालयातून १२ वीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका परिक्षा सुरू होताच व्हॉट्सअॅपवरून बाहेर आल्याची चर्चा होती. त्याप्रकरणी चौकशीमध्ये काहीच हाती न लागल्याचा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी दावा केला. देशपांडे विद्यालय भाजप सत्ताधाऱ्याचे असल्याने शिक्षणाधिकारी या शाळेवर कारवाई करण्यापासून घाबरत असल्याचे बोलले जात आहे.

सध्या राज्यात १० वी व १२ वीची परीक्षा सुरू असून राज्यासह बुलडाणा जिल्ह्यातही कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. ज्या परीक्षा केंद्रात ८ विद्यार्थी कॉपी करताना आढळतील त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करणार असल्याचे राज्य शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतानाही मोताळा येथील बबनराव देशपांडे या विद्यालयात परीक्षा केंद्रातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी सर्रास सूट देण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तासानंतरच हिंदी प्रश्न पत्रिकेतील प्रश्न कागदावर लिहून परीक्षा केंद्राबाहेर येत असल्याचा व केंद्राबाहेर आलेल्या प्रश्नांची प्रत स्थानिक झेरॉक्स दुकानातून १०-१० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार समोर आला. या झेरॉक्सच्या मदतीने केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर कॉपीच्या माध्यमातून देण्यासाठी सोय केल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.

याबाबत जिल्ह्याचे परीक्षा नियंत्रक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिल्यावर त्यांनी मोताळा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी आणि पेपर सुरक्षा निरीक्षक नेटके यांनी बबनराव देशपांडे परीक्षा केंद्रावर परीक्षा दरम्यान भेट देत तपासणी केली. तसेच ही जबाबदारी माझी नसून मी प्रश्नपत्रिका सुरक्षा रक्षक असून यासंदर्भात मी काहीही करू शकत नसल्याचे मत नेटके यांनी व्यक्त केले. यावर शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी अजबच प्रतिकिया दिली. ते म्हणाले, की पाहतो अशा प्रकरणात गुन्हा दाखल होवू शकतो का? तर भरारी पथकाला याबाबत विचारल्यावर त्यांनी भरारी पथकाच्या कारवाईवर सोडून चक्क विद्यार्थ्यांच्या पालकांनाच कॉपी न करू देण्याचे आवाहन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details