बुलडाणा -बुलडाणा नगराध्यक्षा यांचे पती मोहम्मद सज्जाद व नगर परिषदेचे लेखापाल अमोल इंगळे यांच्यामध्ये आज मंगळवारी 9 फेब्रुवारीला शाब्दिक हमरीतुमरी झाल्याची घटना घडली. यावेळी काही काळ नगर परिषद अधिकारी-कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले होते. तर लेखापाल अमोल इंगळे हे घडलेल्या प्रकाराबाबत बुलडाणा पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते.
मात्र लेखापाल इंगळे आणि नगर परिषद अधिकारी-कर्मचारी संघटनेने हमरीतुमरीच्या प्रकरणात माघार घेतल्याने प्रकरण शांत झाल्याचे दिसून आले. राजकीय दबावापोटी ही माघार घेण्यात आल्याचे चर्चेतून बोलल्या जात आहे.
बुलडाणा नगर परिषदेमध्ये आज मंगळवारी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्या नगराध्यक्षा नजमोनिस्सा यांचे पती मोहम्मद सज्जाद नगर परिषदेत आले होते. यावेळी नगर परिषदेचे लेखापाल अमोल इंगळे यांच्यामध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. दरम्यान घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषद अधिकारी-कर्मचारी संघटनेने काही काळ कामबंद आंदोलन पुकारून नगराध्यक्षा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
राजकीय दबावापोटी माघार घेण्यात आल्याची चर्चा-
मोहम्मद सज्जाद यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लेखापाल अमोल इंगळे तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले होते. मात्र अचानकच तक्रार न देण्याचा निर्णय लेखापाल अमोल इंगळे यांनी घेतला व कामबंद पुकारलेल्या नगर परिषद अधिकारी-कर्मचारी संघटनेने देखील माघार घेतल्याचे दिसून आले. राजकीय दबावापोटी ही माघार घेण्यात आल्याचे चर्चेतून बोलल्या जात आहे.