बुलडाणा- जिल्ह्याचे ठिकाण असलेला बुलडाणा मतदारसंघ थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जातो. शिवाय राजकारणाच्या दृष्टीने पहिले तर हा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. मात्र, नेत्यांच्या अंतर्गत असलेल्या वादामुळे सलग ३ टर्म शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदे यांच्याकडे हा मतदारसंघ होता. मात्र, काँग्रेसने वाढवलेला जनसंपर्क आणि शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदेंबद्दल मतदारसंघात असलेली नाराजी, शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये असलेले दोन गट यामुळे २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयराज शिंदे हे चौथ्या क्रमांकावर होते.
हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : पवारांचा 'तो' प्रसिद्ध खंजीर.. राज्यातील पहिले आघाडी सरकार व सर्वात तरुण मुख्यमंत्री
मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर शिंदे याना ३२ हजार ९४६ मते मिळाली तर राष्ट्रवादीमधून आमदारकीसाठी मनसेत गेलेले संजय गायकवाड हे दुसऱ्या नंबरवर राहिले आणि त्यांना ३५ हजार ३२४ मते मिळाली. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ याना ४६ हजार ९८५ मते मिळाली आणि ते निवडून आले. निवडणुकीनंतर संजय गायकवाड यांनी खासदार जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता.
सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांचे वैर असल्याने या मतदारसंघात २ गट आहेत. मतदारसंघात जाधवांनी एकटे पाडलेले विजयराज शिंदे आणि खासदार गटात जिल्हाप्रमुख जालींधर बुधवंत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाडसह सर्व पदाधिकारी एकीकडे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कोण? याची उत्सुकता मतदारसंघासह जिल्ह्याला लागली आहे. कारण, मागील वेळीजरी शिवसेनेच्या विजयराज शिंदे यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे मतदारसंघात वलय अजूनही कायम आहे.
हेही वाचा - 'ईडी'बाहेर हजारो कार्यकर्ते राहणार उपस्थित..राष्ट्रवादीकडून शक्तीप्रदर्शनाचे संकेत
शिंदे यांनी अजूनही मतदारसंघात फिरणे सुरूच ठेवले असून त्यांना उमेवारीची अजूनही आशा आहे. मात्र, शिवसेनेत असलेल्या गटबाजीने त्यांना फटका बसण्याची शक्यात वर्तवली जात आहे. विजयराज शिंदे यांची उमेदवारी जरी निश्चित मानली जात असली तरी खासदार जाधव गटात असलेले संजय गायकवाड आणि जालिंदर बुधवंत यांनाही खासदारांनी उमेदवारीची हमी दिली आहे. त्यातच भाजपनेही हा मतदारसंघ भाजपकडे सोडावा अशी मागणी करत मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेत इच्छुकांचा विचार केला तर माजी आमदार विजयराज शिंदे , जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत , उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाडसह अनेकजण इच्छुक आहेत. मुंबईला शिवसेनेच्या मुलखाती झाल्या असून त्यात बुलडाणा मतदारसंघासाठी अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत.