बुलढाणा -जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील चिंचोल शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. गुरुवारी पहाटे या बिबट्याने दोन गाईंवर हल्ला चढवला. यामध्ये एक गाय फस्त करून दुसर्या गायीला गंभीर जखमी केले आहे.
मलकापूर तालुक्यात बिबट्याची दहशत; हल्ल्यात एक गाय ठार
या घटनेची माहिती वनविभाला दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाहणीसाठी आले नव्हते. शेतकऱ्यांने याप्रकरणी नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
तालुक्यातील चिंचोल शिवारामध्ये गुरुवारी पहाटे शेतात बांधलेल्या गायींवर बिबट्याने हल्ला चढवला. त्यामध्ये एक गाय ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. शेतमालक निवास पाटील हे पहाटे शेतात पोहचले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली होती. मात्र, वनविभागाची टीम सायंकाळपर्यंत घटनास्थळी पोहचली नव्हती. गावालगतच बिबट्याचा मुक्त संचार असल्याने गावकरी दहशतीखाली आहेत. बिबट्याने फस्त केलेल्या गाईचा मोबदला देण्यात, यावा अशी मागणी शेतकरी पाटील यांनी केली आहे.