बुलडाणा - विनापरवाना देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केले आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून देशी विदेशी दारूसह दोन लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चिखली येथील शेगाव कचोरी सेंटरसमोर शुक्रवारी १२ मार्च रोजी करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शरद तुळशीदास बोरकर (वय ३२) असे आहे.
चारचाकी वाहनातून वाहतूक
बुलडाणा जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करून त्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांना दिले होते. या आदेशावरून गिते यांनी एक पथक तयार केले. दरम्यान हे पथक चिखली तालुक्यात कार्यरत असताना एका चारचाकी वाहनामध्ये देशी व विदेशी दारूची वाहतक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली.