बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. ठेवींची अफरातफर केल्याप्रकरणी या पतसंस्थेच्या अध्यक्ष , मुख्य शाखा व्यवस्थापक , रोखपाल , आणि शाखा व्यवस्थापक या ४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. परंतू हे सर्वजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा बँकेवर राजकीय वरदहस्त ?
चिखली येथील राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता खरात यांनी १२ वर्षांपूर्वी ११ संचालकांना सोबत घेऊन चिखली शहरात महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था सुरु केली होती. काही वर्षांतच ठेवीदारांचे पैसे असुरक्षित असल्याचे दिसून आले होते. मात्र राजकीय वजन असल्याने आणि संचालक मडंळी सुद्धा राजकारणाशी निगडित असल्याने पतसंस्था चालूच ठेवली गेली. या पतसंस्थेचा आता १२ वर्षांचा कालावधी उलटला आहे.
ठेवीदारांचा आक्रोश
मागील २ वर्षांपासूनच पतसंस्थेची आर्थिक स्थिती बिघडली होती. चिखली तालुक्यातील अनेक ठेवीदीरांच्या एकूण ६ कोटींहून अधिकच्या ठेवी या पतसंस्थेत आहेत. मुदत संपूनही पैसे मिळेनासे झाल्याने, ठेवीदार बँकेत चकरा मारत आहेत. पैसे बुडण्याच्या भितीने कित्येकांच्या अश्रूंचा बांध फूटलेला दिसत आहे. ठेवीदारांनी अध्यक्षांच्या घरी जाऊन भेट घेतली. सहाय्यक निबंधक, जिल्हा सहकारी निबंधक यांच्याकडेही चकरा मारल्या पण थकले पैसे मात्र काही परत मिळत नाहीत. या प्रकरणात कोणाचे १० लाख, कोणाचे १८ लाख तर अगदी २४ लाख रूपये देखील अडकले आहेत. कोणी मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, नातवांसाठी पैसे ठेवलेले आहेत.
ठेवीदारांकडून योग्य कारवाई आणि न्यायाची मागणी
सहकार विभागाने या पतसंस्थेचे मागील २ वर्षाचे ऑडिट केले असता त्यात अनेक धक्कादायक बाबी आढळल्या. बँकेने कर्ज वाटप करताना कोणतेही तारण घेतलेले नाही, अध्यक्ष आणि संचालकांच्या जवळच्या लोकांच्या नावावर पैसे काढल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्यांनी सुद्धा परस्पर पैसे काढल्याचे दिसून आले. या बँकेत अनेक लोकांचे पैसे अडकले असून काही ठेवीदार अद्यापही समोर आलेले नाहीत. संपूर्ण ठेवीदार समोर आल्यास हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पोलिसांत तक्रार दिली गेल्यानंतर बँकेचे अध्यक्ष, मुख्य शाखा व्यवस्थापक, रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक यांच्यावर अपहार केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. परंतू हे सर्वजण फरार आहेत. त्यांच्या अटकेची प्रक्रिया चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान या घटनेनंतर अगोदरच्या काही घटना पाहता, महाराष्ट्रातील कुठल्याच पतसंस्थेतील ठेवी सुरक्षीत नसल्याची ओरड ठेवीदार करताना दिसत आहे.
महात्मा फुले पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणील ४ जनांविरोधात गुन्हे