बुलडाणा- तब्बल ३८ वर्षांपासून शेतात वीज कनेक्शन मिळत नसल्याने जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मलकापूरमधील कृषी प्रदर्शनी मेळाव्यात, राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या समोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १५ जूनला संध्याकाळी घडली. ईश्वर खुपराव खराटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मंत्री, आमदार तसेच विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची साधी भेटही घेतली नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील दौऱ्यात या शेतकऱ्याचा विषय ईटीव्ही भारतने उपस्थित केला होता. तेव्हा त्यांच्यासोबत ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री येरावार उपस्थित होते. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या काळात मागच्या सरकारहून सर्वात जास्त कनेक्शन शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र या शेतकऱ्याचे कनेक्शन का राहिले ते तपासावे लागेल, असे उत्तर दिले होते. त्यानंतर या शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरले आहे.
१६ डिसेंबर १९८० साली महावितरणकडे भरली होती डिमांड नोट-
ईश्वर खराटे यांच्याकडे वळोदा गावात वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. या शेतीमध्ये वडिलोपार्जित विहीर आहे. शेतीजवळच विद्युत पोल आणि जवळच विद्युत डीपी आहे. ईश्वर खराटे यांचे आजोबा श्रीराम खुपराव खराटे यांनी विद्युत कनेक्शनसाठी महावितरणकडे (पूर्वीची एमएसईबी) १६ डिसेंबर १९८० साली ५५५ रुपयांची डिमांड नोट भरली होती. त्याची प्रतदेखील ईश्वर यांच्याकडे आहे. विद्युत कनेक्शनसाठी श्रीराम खराटे यांनी सरकारदरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर ईश्वर यांचे वडील सुपराव श्रीराम खराटे यांनीदेखील पाठपुरावा केला. तरीही या शेतकरी कुटुंबाला विद्युत कनेक्शन मिळाले नाही.
वीज कनेक्शनसाठी केले होते उपोषण-
तिसऱ्या पिढीतील ईश्वर खराटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कनेक्शन मिळावे यासाठी महावितरण तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी एप्रिल २००६ मध्ये ७ दिवस शेतीत कनेक्शन मिळावे यासाठी उपोषणही केलेले आहे. मलकापूर विद्युत महावितरणाच्या आश्वासनावर त्यांनी उपोषण सोडले होते. यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतरही त्यांच्या शेतात अद्यापर्यंत कनेक्शन मिळाले नाही.