बुलढाणा - Maratha Protest against Lathicharge : जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याचे तीव्र पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत. आज (3 सप्टेंबर) बुलढाणा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याकरता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बुलढाण्यात येत आहेत. यावेळी सकल मराठा समाजाने बुलढाणा जिल्हा बदंची हाक दिली. तसेच बुलढाणामधील महामार्गावर मराठा समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.
कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड - जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज बुलढाण्यात रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. सकाळी दहा वाजेच्या सुमारास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार होते. परंतु, बुलढाणा शहर पोलिसांनी बुलढाण्यातील रास्ता रोको आंदोलन होण्यापूर्वीच नेते आणि कार्यकर्त्यांना रोखले. शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस यांना सकाळी पोलिसांनी घरून ताब्यात घेतले, तर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांना सकाळी पोलिसांनी त्यांच्या घरून पोलीस स्टेशनला आणले. काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेत्यांसह जवळपास 30 ते 40 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.
मुख्यमंत्री बुलढाण्यात - मागील तीन ते चार वेळा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता हा कार्यक्रम आज पार पडत आहे. एकीकडे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शहरात असताना दुसरीकडे मराठा समाजाने आज जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त शहरात तैनात केला आहे.