बुलडाणा- नांदुरा तालुक्यातील खातखेड शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्याने प्राणघतक हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी चार वाजेदरम्यान घडली होती. या हल्ल्यात सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता पाठविण्यात आले होते. मात्र, पुढील उपचाराकरता त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
खातखेड शिवारात बिबट्याचा सात जणांवर हल्ला; एकाची प्रकृती गंभीर - PSI Ghodeswar
हल्ल्यात सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता पाठविण्यात आले होते. मात्र, पुढील उपचाराकरता त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
नांदुरा शहराजवळच असलेल्या खातखेड शिवारात सुपडा निंबाजी वानखडे (रा. वडाळी, वय ३५) व दीपक भोनाजी जाने (रा. खातखेड, वय ३०) हे दोघे आपल्या शेतात काम करत होते. त्यादरम्यान बिबट्याने या दोघांवर जीवघेणा हल्ला केला. त्याने दोघाही शेतकऱ्यांना पंजा मारून व चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्यानंतर खातखेड गावाजवळ वासुदेव ओंकार बोंद्रे (वय ६०) या वयोवृद्धास व शिवसेना तालुकाप्रमूख संतोष डिवरे, शिवदास अर्जुन डाबेराव (वय ५५, रा. धानोरा) व अन्य दोघांना गंभीर जखमी केले. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष राजेश एकडे, विलास निंबोळकर, बबलु जुनगडे व ओमसाई फाऊंडेशनचे कार्यकरत्यांनी जखमींना उपचाराकरता प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल यांनी जखमींवर उपचार केले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्यानंतर तो खातखेड गावाजवळच दडून बसल्याने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती नांदुरा पोलीस स्टेशन चे कान्स्टेबल रवींद्र हजारे यांनी वन विभागाचे कर्मचारी पठाण यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे मोरे आणि पी.एस.आय घोडेस्वार घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडून बिबट्याची शोधमोहिम घेतली जात आहे.