बुलडाणा- लोकसभेत सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी या विधेयकाला विरोध होत आहे. शुक्रवारी बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखाली शेगाव, संग्रामपुर, नांदुरा आणि मलकापूर शहरात जमीयत उलेमा हिंद या संघटनेकडून मोर्चे काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सदर विधेयक नामंजूर करण्यात यावे, अशी मागणी करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
जमीयत उलेमा हिंदचे आंदोलन काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष या विधेयकात मुस्लिम शरणार्थींना भारतीय नागरिकत्व न देण्याच्या मुद्द्याला जोरदार विरोध करत आहेत. नागरिकता दुरुस्ती विधेयक हिंदू-मुस्लीम एकतेच्या विरोधातले असून हा अन्याय आहे, असे नमूद करत हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांनी केली.
हेही वाचा - खामगाव वन्यजीव परीक्षेत्रात 'सी१' वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
शुक्रवारी नमाजनंतर स्थानिक तहसील कार्यालयावर जमा होण्याचे आवाहन जमीयत उलेमा हिंद या संघटनेकडून करण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही शहरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी शांततेच्या मार्गाने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
हेही वाचा -बुलडाणा जिल्ह्यातील पंचायत समितीवर येणार 'महिला राज'
संग्रामपूर येथे शासनाच्या विरोधात नारेबाजी करत नायब तहसिलदार राठोड यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. अभय मारोडे, श्याम डाबरे, मौलाना इरफान, मौलाना महेमुद, मुफ्ती समी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मौलाना महमूद बेग, मौलाना इरफान, मुफ्ती सामी, मौलाना झाकुल्लाह, मौलाना जफर, अभय मारोडे, हरिभाऊ राजनकार, राजू वानखडे, प्रमोद गडे, श्याम डांबरे, श्रीकृष्ण तराडे, मोहन पाटील आदि उपस्थित होते.