महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा मतदारसंघ : प्रतापरावांच्या संपत्तीत ९ पटीने तर डॉ. शिगणेच्या संपत्तीतही ४ पटीने वाढ

युतीचे उमेदवार जाधवांच्या संपत्तीत ९ पटीने तर आघाडीच्या उमेदवार डॉ.शिगणेच्या संपत्तीतही ४ पटीने वाढ झाली आहे. म्हणजेच महायुती आणि महाआघाडी दोन्हीचे उमदेवार कोट्याधीश आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

प्रतापराव जाधव, डॉ. राजेंद्र शिंगणे

By

Published : Mar 27, 2019, 1:39 PM IST

बुलडाणा- युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे हे सन २००९ नंतर बुलडाणा लोकसभेच्या रिंगणात आमने-सामने आहेत. २००९ ते २०१९ या १० वर्षाच्या दरम्यान युतीचे उमेदवार जाधवांच्या संपत्तीत ९ पटीने तर आघाडीच्या उमेदवार डॉ.शिगणेच्या संपत्तीतही ४ पटीने वाढ झाली आहे. म्हणजेच महायुती आणि महाआघाडी दोन्हीचे उमदेवार कोट्याधीश आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

प्रतापरावांच्या संपत्तीत ९ पटीने तर डॉ. शिगणेच्या संपत्तीतही ४ पटीने वाढ

युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे बुलडाण्यातील उमेदवारांमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. तर आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची श्रीमंती प्रतापराव जाधवांपेक्षा कमी आहे. दोघांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.

प्रतापराव जाधव कुटूंबाची संपत्ती ११ कोटी २६ लाख ७२ हजार ९६६ रुपये असून डॉ. राजेंद्र शिंगणे यांची एकुण संपत्ती ९ कोटी ५३ लाख ५० हजार ३६५ रुपये इतकी नमूद करण्यात आलेली आहे. रोख रक्कम, बँकेच्या ठेवी, शेअर्स, दागिणे, शेती, प्लॉट, फ्लॅट यांच्या विवरणासह कर्जाची माहितीही अर्जात आहे. जाधव यांच्यावर टोयोटो फॉरच्युनर वाहनासाठी घेतलेल्या कर्जापैकी ७ लाख ३५ हजार रक्कम फेडायची बाकी आहे. तर डॉ. शिंगणेंवर एका पतसंस्थेचे सुमारे २ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज आहे. एका खाजगी व्यक्तीकडून त्यांनी १४ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज घेतलेले असल्याचाही उल्लेख शपथपत्रात आहे.

दहा वर्षांपूर्वी, सन २००९ मध्ये हेच दोन उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यावेळी त्यांनी दिलेली शपथपत्रात नमूद केलेली संपत्ती आणि आजच्या शपथ पत्रात नमूद केलेली आजची संपत्ती यात वाढ झालेली आहे. २००९ मध्ये जाधव यांच्याकडे १ कोटी २७ लाख २ हजार ८२० रुपये तर डॉ. शिंगणे यांच्याकडे २ कोटी २४ लाख ७४ हजार ५४७ रुपये होते. आजच्या तुलनेत जाधव यांची मालमत्ता ९०० पट तर शिंगणे यांची मालमत्ता ४०० पट वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी शिंगणेंपेक्षा कमी संपत्ती असणार्‍या प्रतापरावांनी शिंगणेंना पछाडले, हे मात्र आकडे सांगत आहेत.

जिल्ह्याचे राजकारण आपल्याभोवती फिरविणारे हे दोन्ही दिग्गज मागील ३ दशकांपासून राजकारणात आहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर २ वेळा त्यांनी मंत्रीपद भोगलेले आहे. प्रतापरावांनी आमदारकीची हॅटट्रीक केलेली आहे. राज्यमंत्रीपदाचा सन्मानही त्यांना मिळालेला आहे. याशिवाय २००९ पासून सलग २ वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. आमदार आणि खासदारांना मिळणारे वेतन सर्वश्रृत आहे. एकदा आमदार निवडून आल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतनही सुरु होते. दुसर्‍यांदा निवडून आल्यानंतर त्यात पुन्हा वाढ होते. तात्पर्य या दोन्ही नेत्यांच्या उत्पन्नात आमदार- खासदाराला मिळणारे वेतन, इतर लाभ तथा निवृत्ती वेतनानेही भरघोस वाढ केलेली आहे.


जिल्हा बँक प्रकरणात दोघांवरही सारखेच गुन्हे
बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक प्रकरणात दोघांवर सारखेच गुन्हे दाखल आहे. संचालक म्हणून कार्यरत असतांना डॉ. शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांनी अधिकाराचा वापर करताना खोटे पुरावे सादर करणे, खोटे पुरावे खरे भासवून विशिष्ट संचालक व नातेवाईकांना कर्ज पुरवठा करणे, खोटे दस्तावेज सादर करून ठेवीदारांची फसवणूक व गुंतवणूकदारांच्या रकमेचे अपहरण करणे याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवरही कलम १९१, १९२, १९३, ४०५, ४०६, ४२०, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

काँग्रेस नेते तसेच माजी मंत्री डॉ. राजेंद्र गोडे यांनी जिल्हा बँकेच्या थकबाकीदार संचालकांविरोधात कोर्टात धाव घेतल्यानंतर वरील गुन्हे नोंदविण्यात आले होते. या प्रकरणात अद्यापही दोषारोपपत्र दाखल नाही हे प्रकरण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्र. २ मध्ये सुरु असल्याचे शपथ पत्रांमध्ये म्हटले गेले आहे. तत्कालिन २२ संचालकांविरोधात तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रतापराव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे. जिल्हा बँक प्रकरणात दोघांवरही आरोप असल्यामुळे ते बँकेला घेवून एकमेकांवर आरोप करू शकणार नाही, हे मात्र सत्य !

जाधव यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अधिक श्रीमंत
प्रतापराव जाधव यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी राजश्रीताई जाधव अधिक श्रीमंत आहेत. शेती तसेच हॉटेल परिवार आणि कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना उत्पन्न मिळते. याशिवाय जगदंबा ट्रेडींग, जगदंबा ऑटो या कंपन्यांमध्ये त्यांची भागीदारी असल्यामुळे त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्यापेक्षा दुपटीने अधिक संपत्ती त्यांच्या पत्नीकडे आहे. प्रतापराव यांची जंगम आणि स्थावर संपत्ती मिळून ३ कोटी १९ लाख ६९ हजार ४७४ रुपये आहे तर राजश्री जाधव यांची एकुण संपत्ती ८ कोटी ७ लाख ३ हजार ४९२ रुपए एव्हढी आहे. त्यांच्याकडे एकुण दागिने ९७० ग्रॅम वजनाचे आहेत. प्रतापराव यांच्याकडे सोन्याची साखळी, ब्रासलेट आणि २ अंगठ्या आहेत. राजश्री जाधव यांनी जगदंबा ट्रेडींग कं. लि. अंजनी बु. यात ३३ लाख ९७ हजार ६६० रुपयांची तर जगदंबा ऑटोमोबाईल्समध्ये २४ लाख ४७ हजार रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. श्री हॉटेल परिवारात त्यांचे ११ लाख ६६ हजार तर रूज ऍग्रोटेक अंजनी बु. मध्ये त्यांनी २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मेहकरमध्ये ५ ठिकाणी, खंडाळ्यात एका ठिकाणी, अंजनी बु., खामगांव, शेगांव तसेच अकोला जिल्ह्यातील म्हैसपुर याठिकाणी त्यांची शेती आहे. लोणारमध्येही ०.८१ आर जमिनीपैकी त्यांचा चौथा वाटा अहे.

शिंगणेंकडे ७५ एकर शेतजमीन
शेतीच्या बाबतीत डॉ. राजेंद्र शिंगणे हे प्रतापराव यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. प्रतापराव यांच्याकडे एकुण मिळून १२ एकरपेक्षा अधिक शेती नसेल. परंतु त्यांच्या पत्नी राजश्री यांच्याकडे मात्र २८ ते ३० एकर शेती दिसून येत आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे येळगांव, वाघजाळ, बाळसमुद्र याठिकाणी शेती आहे. तसेच त्यांच्या मूळ गावी शेंदूर्जन याठिकाणी त्यांची ३५ एकर शेती आहे. त्यांच्या पत्नी रजनी यांच्या नावावर वाघजाळ याठिकाणी ६५ लाख रुपये किंमतीची ९.५० एकर शेतजमीन आहे. प्रतापराव यांच्याकडे मेहकर, लोणार, खामगांव, मादणी, अंजनी बु., शेगांव, म्हैसपुर (अकोला) याठिकाणी शेतजमिनी आहेत. दोन्ही उमेदवारांच्या एकुण संपत्तीत वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचा समावेश आहे, हे विशेष. प्रतापराव यांच्याकडे १८ लाख ६१ हजार ५०० रुपयांची संपत्ती वारसा हक्काची आहे तर शिंगणेंकडे सुमारे ३ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची संपत्ती वारसा हक्काने मिळालेली आहे.

शिंगणें व प्रतापरावांचे शिक्षण
डॉ. शिंगणे यांनी गुरुकुंझ मोझरी येथील गुरुवेद आयुर्वेद कॉलेजमधून १९८३ मध्ये बीएएमएसची पदवी प्राप्त केली आहे. तर जाधव यांनी १९७९ मध्ये चिखली येथील शिवाजी विद्यालयातून बी.ए. भाग १ पूर्ण केले आहे.

शिंगणेचा मुंबईत तर प्रतापरावांचे पुण्यात प्लॉट-
डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपले निवासस्थान बुलडाणा दाखविलेले आहे. त्यांच्या निवासस्थानाची किंमत एक कोटी २५ लाख रुपये प्लॉटसह दाखविण्यात आलेली आहे. तर प्रतापराव जाधव यांचे मेहकर येथील निवासस्थानही एक कोटी २ लाख रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांचे फ्लॅट आहेत. जाधव यांचा फ्लॅट पुणे शहर येरवडा भागात हर्मेस हेरीटेज हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील दुसर्‍या मजल्यावर आहे. ५७२.८६ चौरस फूटाचा हा फ्लॅट १९९८ मध्ये केवळ सव्वा दोन लाख रुपयांमध्ये घेण्यात आला होता. आजमितीस त्याचे बाजारमूल्य ५२ लाख रुपये आहे. शेगांव शहरात दोन फ्लॅट आणि औरंगाबाद येथील जालना रोडवर विद्यानगरात शुभम अपार्टमेंटमध्ये जाधव यांचा फ्लॅट आहे. डॉ. शिंगणे यांनी मुंबई वरळी येथील शुभदा अपार्टमेंटमध्ये ५८६ स्न्वेअर फूटाचा फ्लॅट घेतलेला आहे. ७ वर्षांपूर्वी त्यांनी हा फ्लॅट १ कोटी ६० लाख रुपयांना घेतला होता. शपथपत्रामध्ये इतरही गोष्टींचा उल्लेख आहे. जसे जाधव हे फेसबुक, व्हॉट्सऍप सारखे सोशल माध्यम वापरत नाही. परंतु डॉ. शिंगणे दोन्हीही वापरतात. दोघांचाही ई-मेल आयडी देण्यात आला आहे. दोघांनीही नियमितपणे आयकर भरला आहे. जाधव यांनी मागील ५ वर्षात पती-पत्नी मिळून २ कोटी रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स दिला आहे. डॉ. शिंगणे यांनी एक कोटी रुपयांपर्यंत आयकर भरला आहे. जाधव यांच्याकडे २ लाख ३० हजार रुपये तर शिंगणे यांच्याकडे ५० हजार रुपये रोख रक्कम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details