बुलडाणा - नवरा-बायकोतील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र बुलडाण्यातील एका नवरा-बायकोच्या भांडणाचे कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. केवळ दोन अंड्यांवरून या नवरा-बायकोमध्ये वाद झाला आणि तो वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. या अनोख्या वादाची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
अंड्यांमुळे झाली वादाची सुरूवात
तर त्याचे झाले असे की, बुलडाणा जिल्ह्यातल्या साखरखेडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने संध्याकाळी जेवणासाठी घरी दोन अंडी आणली. यानंतर याची भाजी करून दे असे तो पत्नीला म्हणाला. पत्नीनेही या अंड्यांची भाजी केली. मात्र ही भाजी तिने मुलीला खायला दिली. नेमके यावरूनच पतीदेवांचा राग अनावर झाला आणि वादाची ठिणगी पडली.
अंड्यांमुळे झाली वादाची सुरूवात पोलिसांत पोहोचला तंटा
अंड्यावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांनी पतीलाही पाचारण केले. फक्त अंड्यांवरचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचल्याने कारवाई करावी की भांडण सोडवावे या पेचात पोलीस पडले.
पोलिसांनी अंडे दिल्यावर मिटला वाद पोलिसांनी अंडे दिल्यावर मिटला वाद
यानंतर ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी दोघांनाही शांत केले. तसेच दोन अंडे विकत आणून त्यांना दिले. अखेर पोलिसांनी अंडे आणून दिल्यावर या दोघांमधील वाद मिटला आणि दोघेही हसत हसत घरी परतले. या अनोख्या भांडणाची सध्या सगळीकडेच चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
हेही वाचा -उधारीवर घेतलेली 'स्ट्रॉबेरी' विक्रेत्याच्या बेतली जीवावर