बुलडाणा - जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसाने सध्या अक्षरशः कहर केला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गणेशपूर भागातील अनेक जनावरांसह शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. एवढेच नव्हे तर २०० च्या जवळपास कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील घाटाखाली नुकसानाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. दिवठाणा, पोरज हे गाव सध्याही पाण्याने वेढलेले आहे. येथील गावकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे खामगाव तालुक्यातील मेंढपाळ बहुल भाग असलेल्या गणेशपूर हिवरखेड, शिराळा, निरोड, लाखनवाडा, कोंटी, नांद्री या गावातील मेंढपाळांवर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे.