बुलडाणा - वेळोवेळी आंदोलन करून निवेदने देऊनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने अखेर गुरुवारी गावकऱ्यांनी टॉवरवर आणि ग्रामपंचायतीच्या इमारतीवर चढून 'शोले स्टाईल आंदोलन' केले. जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गणेशपूर या गावात हे आंदोलन सुरू आहे. तसेच २६ जानेवारीपर्यंत विविध प्रकारे साखळी आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.
खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथील वार्ड क्रमांक 2 मधील झोपडपट्टीला ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे वेळोवेळी तक्रारी करूनही हक्काचा रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही. तसेच, कुठलीही दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांनी बुधवारी खामगाव येथील पंचायत समिती समोर 'थाळी बजाओ' आणि 'घंटा नाद' आंदोलन केले. मात्र, तरीही दखल न घेण्यात आल्याने शेवटी आज (गुरुवारी) शंभरच्या वर महिला आणि पुरुषांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर चढून आंदोलन सुरू केले आहे. तर, काही युवाकांनी गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. झोपडपट्टीवासियांना रस्ता मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्यची भूमिका या झोपडपट्टीवासियांनी घेतली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी राजपूत यांना विचारले असता झोपडपट्टीची मोजणी करुन कारवाई करू, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा त्रासलेल्या ग्रामस्थांनी घेतला आहे.