बुलढाणा : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आज आहे. आषाढी वारीसाठी आज २६ मे रोजी संतनगरीतून ही पालखी पायदळ पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. यंदा वारीचे ५४ वे वर्ष आहे. प्रथा-परंपरेनुसार ज्येष्ठ शुध्द सप्तमीच्या दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाचे निनादात वाजत-गाजत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने आज सकाळी प्रस्थान झाले.
हजारो भाविकांची गर्दी :आज सकाळी श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी मंदिरात हजारो भाविक गर्दी केली होती. सर्वप्रथम भक्तीमय वातावरणात श्रींच्या रजत मुखवट्याची पुजा करण्यात येते. त्यानंतर पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोतेच्या गजरात भगव्या पताकाधारी वारकऱ्यांसह एका गणवेशात,शिस्तीत टाळ मृदंगाचे निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान केले. श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी श्री शेत्र पंढरपूर पोहोचणार आहे. गजानन महाराजांची दिंडी ही पाच जिल्ह्यातून आपला प्रवास करणार आहे. हा प्रवास साधरण 750 किलोमीटरचा असेल. पंढरपूरला श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच 27 जून ते दोन जुलैपर्यंत मुक्काम राहणार आहे. तीन जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे. जुलै 23 रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे.