बुलडाणा- गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात बुलडाण्यातील मेहकरचे जवान राजू नारायण गायकवाड यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज मेहकर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे वडील नारायण गायकवाड यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
वीर जवान राजू गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार १ मे रोजी गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात सी-६० पथकाच्या १५ पोलीस जवानांना वीरमरण आले होते. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील २ जवानांचा समावेश आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद गावातील सर्जेराव खर्डे तर मेहकर येथील राजू गायकवाड यांचा समावेश आहे.
राजू गायकवाड याचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मेहकर येथे सकाळी ५ वाजता पोहचले. त्यानंतर काही वेळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची शहारातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेत प्रचंड माठ्या संख्येत जनसमुदाय लोटला होता. जिल्हाभरातून लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सर्व राजकीय व सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
'जवान राजू गायकवाड अमर रहे' च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. बुलडाणा जिल्हा पोलिसांच्या वतीने त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग उपस्थितांनी आपल्या डोळ्यात कैद करून घेतला. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु होते. पोलिसांनी मानवंदना दिल्यांनंतर राजू गायकवाड यांच्या कुंटुंबीयांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांचे वडिल नारायण गायकवाड यांनी राजू गायकवाड यांना मुखाग्नी दिला. देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देणारा एक जवान अनंतात विलिन झाला.