बुलडाणा : बुलडाणा : यंदाच्या पावसाळ्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने कहर केला. त्यामुळे खरिपाची पिके हातची गेली. शेतकऱ्यांचे लक्ष रब्बी पिकावर होते. मुसळधार पावसामुळे धरणे, विहिरी ओसंडून वाहत होत्या. त्यामुळे गहू, हरभरा, मका, कांदा, भाजीपाला, मोहरी आदी पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. 17 मार्च रोजी दुपारी, रात्री जिल्ह्यातील मेहकर, चिखली, लोणार, बुलढाणा, मेरा बु., देऊळगाव साखरशा, सिंदखेडराजा, जानेफळ, खामगाव, शेगाव आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. मात्र, तरीदेखील सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही. मागील वर्षाचा पीक वीमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही. या थापाडे सरकारला शेतकऱ्याचे प्रश्न कधी कळतील असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
गहू, हरभऱ्याचे नुकसान :खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव, शहापूर, पळशी, संभापूर, कदमपूर, आंबेटाकळी, शिर्ला नेमाने, लोखंडा, पल्ला, बोरी आरडगाव आदी भागात वादळ, पावसाचा तडाखा बसला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे जिल्ह्यात रब्बीसह कांदा, भाजीपाला, टरबूज, लिंबू, आंबा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता.
तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस :गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांचे हाल होत असून, सर्वेक्षणातून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, 20 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, साठवलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. खामगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश कृषी विभाग, तलाठ्यांना देण्यात आल्याची प्रतिक्रिया खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली आहे. सध्या महसूल कृषी कर्मचारी संपावर आहेत. 28 तारखेपासून अधिकारीही संपावर जाणार आहेत. संपावरील कर्मचाऱ्यांमुळे महसूलची कामे ठप्प झाली असून, पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही रखडल्याचे चित्र आहे.