बुलडाणा- गावात तीन दिवसांपासून वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्याने याबाबत वीजवितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र तक्रार निवारण करण्याऐवजी अधिकाऱ्याने त्या शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर वीज नाही, तर मग फाशी घे, असा अनाहूत सल्लाही दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मेहकर तालुक्यातील भोसा गावात घडली आहे. धनंजय खंडारकर असे संबंधित शेतकऱ्याचे नाव असून दीपक मालोकार असे त्या शिवीगाळ करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
गावात वीज नसल्याची शेतकऱ्याची तक्रार, वीजवितरण अधिकारी म्हणाला... 'फाशी घे'
भोसा गावात तीन दिवसांपासून वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्याने वीजवितरणच्या कनिष्ठ अभियंत्याकडे फोनवर तक्रार केली. मात्र कनिष्ठ अभियंत्याने शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ करत वीज नाही, तर मग फाशी घे, असा अजब सल्ला दिला. त्यामुळे वीजवितरणच्या अधिकाऱ्याविरोधात रान पेटले आहे.
भोसा गावात मागील ३ दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत असल्याने गाव अंधारात आहे. यासंदर्भात ग्रामस्थ गावच्या लाईनमनला रोज विचारणा करत आहेत, मात्र लाईनमनकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने गावातील शेतकरी धनंजय खंडारकर यांनी कनिष्ठ अभियंता दीपक मालोकारला फोन करून विचारले. यावर मालोकारने धनंजय यांना तुझ्याकडून काय होते, ते कर, असे म्हणत, अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एव्हढेच काय, तर काशी कर अन् फाशी घे असेही म्हटले. घाटबोरीला ये भेटायला थोबाडात मारतो तुझ्या, .... का तू .... अशाप्रकारची उद्धट शब्दात मालोकारने धनंजय यांना सुनावले.
शेतकरी धनंजय यांनी दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप तयार करून आमदार संजय रायमुलकर यांना दिली. आमदार रायमुलकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून कनिष्ठ अभियंता मालोकारवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अध्यक्षांनी तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.