बुलडाणा -विद्युत खांबावरील तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून गहु पिकाने पेट घेतल्याने साखळी बुद्रुक येथील पराग रामराव देशमुख या शेतकऱ्याच्या शेताचे नुकसान झाले होते. शेतकऱ्याने याबाबतची माहिती विद्युत वितरण कंपनीला दिल्यावरही विद्युत वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही. याप्रकरणी शेतकऱ्याने ग्राहक मंचात धाव घेतली होती. ग्राहक मंचाने वीज वितरण कंपनीला शेतकऱ्याला व्याजासह 99 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे एकप्रकारे जिल्हा ग्राहक मंचाने वीज वितरण कंपनीला शॉकच दिला आहे.
जिल्हा ग्राहक मंचाचा वीज वितरण कंपनीला शॉक, शेतकऱ्याला ९९ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश हेही वाचा -मलकापूर तालुक्यात बिबट्याची दहशत; हल्ल्यात एक गाय ठार
बुलडाणा जवळील साखळी बुद्रुक येथील पराग देशमुख याच्या शेतात 10 मार्च 2017 ला विद्युत खांबावरील तारांच्या घर्षणाने ठिणग्या पडून गव्हाच्या पिकाने पेट घेतला होता. यावेळी पराग यांच्या शेताजवळच्या शाम देशमुख यांचा आगीमुळे स्प्रिंकलर सेट जळाला होता. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे भरपाई मागितली होती. परंतु, महावितरणने ती अमान्य केली. त्यामुळे पराग या शेतकऱ्याने बुलडाणा जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली होती.
हेही वाचा -शेतातील कुंपनामध्ये अडकला बिबट्या, वन विभागाने केली सुटका
या प्रकरणी अॅड. गुणवंत नाटेकर यांनी प्रबळ युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून गहू पिकाच्या नुकसानापोटी 40 हजार, 2 स्प्रिंकलर सेटच्या नुकसानापोटी 44 हजार असे एकूण 84 हजार रुपये दरसाल दर शेकडा 9 टक्के व्याजाने द्यावे. तसेच मानसिक त्रासापोटी 10 हजार, तक्रार खर्चापोटी 5 हजार रुपये 45 दिवसात देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष विश्वास ढवळे, सदस्य मनीष वानखेडे, जयश्री खांडेभराड यांच्या खंडपीठाने दिला.