बुलडाणा - पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील नितीन राठोड या जवानाच्या गावात कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच आणि अधिकाऱ्यांवरचे दोष सिद्ध होऊनही कारवाही होत नसल्याने आता गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच संदर्भात ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...
वीरमरण आलेले नितीन राठोड यांचे लोणार तालुक्यातील चोरपांग्रा आणि गोवर्धननगर या गट ग्रामपंचायतमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच पद एकाच घरात आहे. त्यांनी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच गावाचा विकास पूर्णतः ठप्प झाला आहे. या गावातील पाण्याची टाकी, अनेक सभागृह, व्यायामशाळा चोरीला गेले आहेत. कारण रेकॉर्डवर ही सर्व कामे झाली आहेत. मात्र, प्रत्यक्षात गावात हे कोठेच दिसत नाही. अनेक घरकुलांचे बांधकाम न करता बिल काढणे, शासकीय जागेत किंवा ग्रामपंचायतला जागेची नोंद नसलेल्या जागेत घरकुल दाखवणे अशा एक ना अनेक प्रकारे शासनाची फसवणूक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तर काही ठिकाणच्या सभामंडपाचे ८ वर्षे आधी बिल काढून आता कामाला थातूर-मातूर सुरुवात केली आहे.
वीरमरण आलेल्या जवानाच्या गावाला भ्रष्टाचाराची किड हा सर्व प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला असून, पुराव्यानिशी या भ्रष्टाचाराची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषापत्र सिद्ध होऊनही कलम ३९(१) नुसार दोषी ठरवण्यात आलेल्यांवर कारवाई होत नाही. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. तर पदाधिकाऱ्यांना अपात्र करण्याच्या आदेशाच्या कारवाईसाठी प्रकरण वरिष्ठांकडे पाठवले असून, पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच संजय चव्हाण, सचिव नितीन सदार, व्ही. एस. गीते यांच्यासह लोणार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, इंजिनियर, गटविकास अधिकारी दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून, माजी पदाधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
वीरमरण आलेले जवान नितीन राठोड यांच्यामुळे गावचे नाव चोरपांगारा काढून वीरपांगरा करण्यासाठी गावकरी प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे भ्रष्ट पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमुळे या हुतात्म्यांच्या गावाची प्रतिमा मलीन होत आहेत. त्यामुळे या भ्रष्ट लोकांवर कठोर कारवाई झाल्यास हीच नितीन राठोड यांनी खरी आदरांजली ठरेल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.