बुलडाणा - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीसाठी चीनहून येणारे साहित्य नागरिकांकडून आणि बच्चे कंपनीकडून टाळले जात आहे. भारतात विविध उत्सवांसाठी चीनहून मोठ्या प्रमाणात साहित्य आयात केले जाते. याला मागणीही मोठ्या प्रमाणात असते. मात्र, यंदा ग्रामीण भागात नागरिक आणि लहान मुलांकडूनही नैसर्गिक रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.
आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी होळी हा एक उत्सव आहे. हा सण अतिशय जल्लोषात साजरा होतो. याच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन करून अनेक ठिकाणी रंग खेळले जातात. यासाठी दरवर्षी पिचकारी, रंगांना मोठी मागणी असते. यातील बहुतेक वस्तू चीनहून आयात होतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या भीतीने चायनीज वस्तूंकडे लोकांनी पाठ फिरवली आहे.