बुलडाणा- राज्याचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी आपले आमदार पाठवले आहेत. त्यानुसार आज बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे ११ आजी-माजी आमदारांचे पथक दाखल होणार असून २ दिवस त्यांचा पाहणी दौरा चालणार आहे.
काँग्रेसचे आजी-माजी ११ आमदार करणार दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी - पाहणी
काँग्रेस पक्षाने विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी आपले आमदार पाठवले आहेत.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविवण्याचे आदेश दिले आहेत. महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, जलसंधारण, जलसंपदा आणि ग्रामविकास विभागाच्या यंत्रणांना हे आदेश देण्यात आले आहेत. दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखडा नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या आमदारांना जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी पाठवले आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला,वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर या ६ जिल्ह्यात काँग्रेसची ११ आमदारांची दुष्काळ पाहणी समिति दुष्काळी दौऱ्यावर आहे. ही ११ आमदारांची समिती दुष्काळी भागातील नागरिक व शेतकऱ्यांशी चर्चा करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहे. या समितीमध्ये राज्याचे विधिमंडळ उपनेता विजय विडेटटीवार, वसंत पुरके, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार रंजीत कांबळे, आमदार राजेन्द्र मूळक, आमदार सुनील केदार, आमदार राहुल बोन्द्रे, आमदार अमर काळे, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, आमदार अमित झनक व आमदार अतुल लोंढे यांचा समावेश आहे.