बुलडाणा : सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. शहरात ठिकठिकाणी कॉफी कॅफे थाटण्यात आले आहे. या कॅफेमध्ये द्वार बंद केबिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या द्वार बंद केबिनचा अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी गैरफायदा घेत असल्याची तक्रार सकल मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत तब्बल 15 कॅफेंवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर एका कॅफे मालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
बंदद्वार कॅबिनमध्ये अश्लील चाळे :बुलढाणा शहरात कॅफे मालकांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. या कॅफेमध्ये कॅबिनची सुविधा देण्यात आली आहे. तरुणाईला त्याची भुरळ पडत आहे. अनेक तरुण या ठिकाणी बंद द्वार कॅबिनमध्ये अश्लील चाळे करत असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत. त्यासाठी सकल मराठा समाजाकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तक्रार देण्यात आली आहे. शहरातील बंद द्वार कॅफेमध्ये अनेक तरुण-तरुणी अश्लील चाळे करत आहे. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित होऊ शकते. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरनी लक्ष घालून तात्काळ आक्षेपार्ह कॅफे बंद करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.