बुलडाणा- दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये शेगाव तालुक्यातील येऊलखेड गावातील अतुल महादेव आळशी (वय २४ वर्ष) यांचा समावेश आहे. संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला असून अतुल महाराज हे त्यांचे परमशिष्य होते.
दिवे घाटातील दिंडी अपघातात शेगावचे एक वारकरी ठार - वारकरी ठार
दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अतुल महादेव आळशी हे वारकरी ठार झाले आहे.
अतुल यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर ते वारकरी संप्रदायात सहभागी झाले होते. त्यांचा धार्मिक कार्य, भजन कीर्तन आणि वारकरी संप्रदायात जास्त रस होता. ते आळंदी व अन्य ठिकाणी कीर्तन प्रवचन शिकले. त्यांचे गुरू सोपान महाराज नामदास हे होते. या दिवाळीत अतुल महाराज घरी आले व नंतर पालखीत सहभागी होण्यासाठी परत गेले होते. त्यांचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे दिड एकर शेती असून अतुल यांच्या पाश्चात आई, बाबा, बहीण असा परिवार आहे. एकुलता एक मुलाचे अपघाती निधन झाल्याने आळशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर आज (बुधवार) सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.