बुलडाणा - कोंबड्यामुळे कोरोना होतो, या अफवेमुळे बहुतांश नागरिकांनी चिकन व अंडी खाणे जवळपास टाळले होते. परिणामी अनेकांनी आपल्या कोंबड्या जिवंत गाडल्या. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता कोरोना संसर्गात अंडी लाभदायक असल्याचे समोर आले आहे. यामुळे अंड्यांची मागणी वाढली आणि पोल्ट्री फार्मवाल्यांना 'अच्छे दिन' आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील किन्होळा गावात शेतकरी अरुण बाहेकर राहतात. त्यांची ५ एकर शेती आहे. पण त्यांना त्या शेतीत मागील चार वर्षांपासून फायदाच झाला नाही. कारण पावसाच्या अनियमिततेमुळे तोंडाशी आलेले पीक अनेकवेळा वाया गेले. यावर त्यांनी शेतीवर पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म उभारला. यात त्यांना सुरुवातीला नुकसान झाले.
अशात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आणि कोंबड्यांमुळे कोरोना होतो ही अफवा पसरली. यात देखील अरुण यांचे प्रचंड नुकसान झाले. पण ते डगमगले नाही. त्यांनी आपला व्यवसाय नेटाने सुरू ठेवला. कालांतराने या महामारीच्या परिस्थितीत अंडी खाल्याने प्रतिकार शक्ती वाढते ही बाब समोर आली आणि अंड्याची मागणी वाढली. यामुळे अरुण यांना आता चांगलाच फायदा मिळू लागला आहे.