बुलडाणा - चीननंतर जगात अनेक ठिकाणी 'कोरोना' विषाणूचे रूग्ण पहायला मिळत आहेत. याबरोबर भारतातही काही ठिकाणी या विषाणूची लागण झालेले 29 रूग्ण पहायला मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी यावर्षीची सैलानी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी अधिकृत घोषणा केली आहे. तर महिला दिनाचेही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर पिंपळगाव सराई येथून गावातून दर्गा पर्यंत निघणार बाबांचा संदल प्रथेनुसार मोजकेच मुजावर करणार आहेत. या ठिकाणी होणारी नारळाची होळी आणि संदल रद्द करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी ठेवण्यात येत आहे. राज्यभरात हजारो लोक एकत्र येणारे मोठे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने सैलानी यात्राही रद्द करण्यात आली आहे. या अनुषंगाने सैलानी यात्रेसंदर्भात गुरुवारी 5 मार्चला अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्या बैठकीस यात्रे रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.