बुलडाणा- भारतीय जनता पक्ष इतर पक्षांच्या लोकांना मोठी आमिष दाखवून, दबाव आणून पक्ष प्रवेश करवून घेत आहे. त्यामुळे लोकशाही मूल्ये धोक्यात आली आहेत. याला आम्ही बळी पडणार नाही, उलट काँग्रेस पक्ष मोठ्या जोमाने कामाला लागला आहे. पुढील काळात आम्ही मोठे यश प्राप्त करु, असा विश्वास व्यक्त करून वंचित बहुजन आघाडी निवडणुकीनंतर विरोधी पक्ष राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य हे हास्यास्पद असल्याचे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक यांनी सांगितले.
ते बुलडाणा आणि चिखलीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीला आले होते. त्यादरम्यान त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील नांदुरा, चिखली आणि बुलडाणा तालुक्यात जाऊन काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहे. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष हा वंचित बहुजन आघाडी राहील, या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे अत्यंत हास्यास्पद आहे. निवडणूक आतापर्यंत जाहीर झालेली नाही. पण निवडणुकीचा परिणाम कसा राहील याच्या संदर्भात मुख्यमंत्री आजच सांगू लागले आहे. कोणाचे सरकार येईल कोण विरोधी पक्षांमध्ये राहील, अशा सर्व बाबींबद्दल मुख्यमंत्री कसे बोलू शकतात याचे मला पूर्णपणे आश्चर्य वाटत आहे.
ते जे काही मागच्या निवडणुकीमध्ये बोलले होते त्याचे मला स्मरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आणि तरुणांना अनेक प्रकारची आश्वासने दिली होती. महाराष्ट्राचा औद्योगिक विकास कसा केल्या जाईल, महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा प्रश्न कसा सोडविला जाईल, शेती उत्पादन कसे वाढवल्या जाईल, अश्या प्रकारच्या विविध गोष्टीच्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिली. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल, विम्याबद्दल काय झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल काय झाले, या सर्व परिस्थितीबद्दल आज महाराष्ट्राच्या लोकांना जाणीव आहे.