बुलडाणा -शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकऱ्याचा आवाज ऐकून नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याची अस्वलाच्या तावडीतून सुटका केली. गजानन अशोक कोल्हे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. बुलडाण्याच्या धोडप शिवार परिसरात ही घटना घडली आहे. कोल्हे यांना उपचाराकरिता बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुलडाण्यात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - बुलडाणा
परिसरात सातत्याने वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. परिणामी वनविभागाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चिखली तालुक्यात डोंगरशेवली, धोडप, पळसखेड, शेलसूर, करवंड या गाव शिवारामध्ये अस्वलांचा वावर आहे. परिसरात वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या महिन्याभरात दोन व्यक्तींवर अस्वलांचे हल्ले झाले असून गेल्या २-३ वर्षात अनेक शेतकऱ्यांचा अस्वलांच्या हल्ल्यात मृत्यूही झाला आहे. गाव शिवारामध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना जागृतीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेतामध्ये काम करत असताना आसपास वन्यप्राण्यांची चाहूल लागताच सुरक्षित स्थळी नेण्याचा सल्ला वनविभागाकडून शेतकऱ्यांना सातत्याने देण्यात येत आहे. वनविभागाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.