अमरावती -जिल्ह्यात दर दिवसाला कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता अमरावती महानगरपालिकेने अमरावती शहरातील बारा ठिकाणांना कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहे. दरम्यान अमरावती शहरात तब्बल 60 टक्के भागांमध्ये तुरळक ठिकाणी कोरोनाचा फैलाव झाल्याची माहिती अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे. कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ठिकाणांची आज आयुक्त प्रशांत रोडे यांनी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
बारा प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण
अमरावती शहरात प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसांपर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंध क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिकेने कंटेनमेंट झोन जाहीर केलेले आहे, त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त रोडे आज रस्त्यावर उतरले होते. या बारा प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
शहराच्या 60 टक्के भागांमध्ये विळखा
अमरावती महानगरपालिका हद्दीत सध्या 2783 कोरोनारुग्ण असून अमरावती शहराच्या 60 टक्के भागांमध्ये कोरोनाने विळखा घातला असल्याची माहिती रोडे यांनी दिली आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 36 तासांचा लॉकडाऊन घोषित केला केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा बंद राहणार आहेत. आज अमरावतीकरांनी या लॉकडाउनला उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर कोरोना परिस्थितीसंबंधी ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.