बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षापासून भाजपची सत्ता कायम आहे. या मतदारसंघाचा विकास करण्याची धुरा भाजपने आमदार चैनसुख संचेती यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार संचेती यांनी मलकापूर मतदारसंघातील अलमपूर गावाचा विकास करण्यासाठी त्यास आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले होते. गावाला दत्तक घेतल्यानंतर आमदार संचेती यांनी गावात नारळ फोडून विकास कामांचे भूमिपूजन देखील केले. मात्र, गावात विकास कामे झालीच नसल्याचे चित्र असून गावकऱ्यांना अजूनही विकासाची प्रतीक्षा आहे.
अलमपुरात आमदार आदर्श ग्राम योजनेतून आत्तापर्यंत फक्त ७ लाख रुपयांची विकास कामे झाल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. मात्र गावात कुठलेच विकास कामे न झाल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे. गावात विकासकामांच्या भूमीपूजनाच्या पाट्या लागल्या आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणचे कामे अद्याप झाले नसल्याचे गांवकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेत रस्ते नाही. केवळ शेतरस्त्यांच्या खडीकरणासाठी भूमीपूजन झाले आहे. मात्र या कामात देखील प्रत्यक्षात शेत रस्त्याचे काम झाले नाही. विकास तर दूरच राहिला आमदार संचेती गेल्या ५ वर्षात अलमपूर गावात फिरकलेच नाहीत. ते केवळ निवडणुकी पुरतेच गावात येतात, असे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गावातील सर्वात प्रमुख समस्या म्हणजे, गावाच्या मधोमध जाणारा नाला हा गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तर पावसाळ्यात या नाल्याचे सांडपाणी गावात शिरते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना या सांडपाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे. गावात मुलभूत सुविधांचा देखील अभाव आहे. बेकार रस्ते, सांडपाण्याची अव्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता, आरोग्य सुविधा, अशा अनेक समस्यांनी या गावाला ग्रासले आहे.